
संमेलनाध्यक्षपदी गझलकार शिवाजीराव जवरे यांची केली निवड…
अमळनेर:- खान्देश साहित्य संघातर्फे २७ व २८ जानेवारी पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंत्री अनिल पाटील यांची तर संमेलनाध्यक्षपदी गझलकार शिवाजीराव जवरे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी दिली.

साने गुरूजी साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे हे संमेलन होणार आहे. प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या अमळनेर शहरात संमेलन होत असून अमळनेर शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याने नामदार अनिल पाटील यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी सर्व साहित्यिक गझलकारांची ईच्छा होती. म्हणून त्यांची निवड करण्यात आली. कोणताही साहित्य प्रकार वंचित राहू नये अशी त्यांची भूमिका असते. जगभरातील विविध भाषांमध्ये लिहिला जाणारा गझल सारखा साहित्य प्रकार गझलसम्राट सुरेश भट यांच्या माध्यमातून मराठीत उंचीला गेला आणि अलीकडे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात अहिराणी गझल मुशायरा चांगलाच गाजला. म्हणून मराठीच्या समृध्दतेची कास धरत असलेली अहिराणी व इतर बोलीभाषांमध्ये देखील गझल लिहिली जाते. हा धागा साने गुरुजी, बहिणाबाईंच्या खान्देश भूमीत अधिक संपन्न व्हावा व बोलीभाषांसह मराठीची समृध्दी व्हावी म्हणून गझल संमेलन होणे गरजेचे आहे. यासाठी संमेलनाच्या उत्तम आयोजन व यशस्वीतेसाठी नामदार अनिल पाटील यांची निवड ऐतिहासिक ठरणार आहे. तर अध्यक्ष म्हणून बुलढाणा येथील जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे यांची निवड करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या गझल लेखनातून सामाजिक वास्तव मांडणी करतात. त्यांची कवी, गझलकार, लेखक, पक्षीमित्र व विविध भाषा अभ्यासक म्हणून ओळख आहे. त्यांची दोन गझलप्रधान काव्यसंग्रह, गझलसंबंधी अन्य दोन पुस्तके प्रकाशित असून विदर्भाची संघर्षयात्रा हा चरित्रग्रंथ, किशोर गीत (बालगीत संग्रह), उर्दू शिका हे उर्दू शिकण्यास उपयुक्त पुस्तक, प्रभावी सुत्रसंचालन, नोंदण- गोंदण, साईन- कोसाईन इ. आठवडी सदरातील संकलनाचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत. यावेळी सचिव तथा ६ व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश बोरसे, आयोजन समिती प्रमुख हेमलता पाटील, समिती सचिव शरद धनगर, समिती उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, राज्य ग्रंथालय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे, खान्देश साहित्य संघाच्या सुनिता पाटील, रत्नाकर पाटील, संजय पाटील, छाया इसे, शरद पाटील, रामकृष्ण बाविस्कर, दत्तात्रय सोनवणे, गोपाल हडपे, अशोक इसे, रेखाताई मराठे, वाल्मिक पाटील, मा. रजनीताई पाटील, पूनमताई शिंदे, तेजस पाटील यांच्यासह साहित्यिक गझलकार व खान्देश साहित्य संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.