
अमळनेर:- सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यातच कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे. पर्यावरणात वातावरणीय बदल झाल्यामुळे अनेक आजार बडावले आहेत. सकाळी तीव्र धुके वातावरणात असते. या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होणे स्वाभाविक आहे. त्यातच अमळनेर मधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) कमालीचा वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन डी ए धनगर यांनी केले आहे.

अमळनेर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक साधारण १९० ते २०० च्या जवळपास असल्याने हवेमध्ये प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. १५० च्यावर हवेचा निर्देशांक जाणे हे काळजी करण्यासारखे असते. त्याहून अधिक हवेचा निर्देशांक जेव्हा २०१ वर जातो, तेव्हा खूप काळजी करण्यासारखे असते. राजधानीत हवेचा निर्देशांक वाढल्यामुळे तेथील नागरिक प्रचंड तणावात आहेत. अनेक विमान फेऱ्या धुक्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याकरिता सर्व सजग नागरिकांनी हवेत प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्याचा हवेचा वाढलेला निर्देशांक जळगाव जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. हवेमध्ये जेव्हा कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायॉक्साईड, ओझोन, सल्फर डाय ऑक्साईड यांचे व इतर वायूंचे प्रदूषण वाढते तेव्हा हवेचा निर्देशांक वाढतो. त्यामुळे प्रदूषक वायू हवेमध्ये मिसळले जाणार नाहीत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक डी ए धनगर यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण हातभार लावत प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले आहे.




