
अमळनेर:- तालुक्यातील नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिवद येथे स्काउट व गाईडचे हिवाळी निवासी शिबीर आयोजित करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे व गवते सर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे मा. प्रेसिडेंट गुणवंतराव पाटील होते. यावेळी संस्थेचे सचिव सुभाष पाटील, संचालक निंबा पाटील, राजेंद्र पाटील, पांडुरंग पाटील, रविंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी प्रतिभा परदेशी यांनी विद्यार्थ्यांना स्काउट चळवळीचा इतिहास सांगितला. तर स्काऊटचे सांकेतिक चिन्ह व खूणा याबाबत नरेंद्र घोरपडे, प्रथमोपचारासंदर्भात संदीप मोरे यांनी मार्गदर्शन केले. निसर्ग सहल व खेळ गीते उपशिक्षक रविंद्र शेलकर व भटेश्वर भदाणे यांनी आयोजित केले.रात्री शेकोटीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या तीन दिवसीय निवासी शिबीराच्या समारोपावेळी माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील प्रमुख अतिथी होते.समारोपाच्या अध्यक्षस्थानी जयवंतराव पाटील होते.प्रास्ताविक संगिता वैद्य यांनी केले.यावेळी तुषार पाटील, संजय पाटील व किरण निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.भावेश पाटील व दिव्या पाटील या विद्यार्थ्यांनी आपले तीन दिवसातील शिबीराचे अनुभव सांगितले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक आसाराम सैंदाणे व पर्यवेक्षक सुनील पाटील उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन सुशिल भदाणे यांनी केले तर आभार किशोर पाटील यांनी मानले.




