
अमळनेर आगाराच्या वाहक उषा शिंदे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक…
अमळनेर:- बहिणीकडील लग्न आटोपून परत जाणाऱ्या महिलेची बस मध्ये हरवलेली पर्स महिला वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे दोन दिवसांनी परत मिळाली आहे.

जोधपूर येथील रुपाली सागर पाटील या दिनांक २ रोजी अमळनेर तालुक्यात सारबेटे येथे आपल्या बहिणीकडे लग्नाला आल्या होत्या. लग्न आटोपून दुपारी चार वाजता अमळनेर खेडी ढोक पारोळा बसने सारबेटे येथून पारोळा जाण्यासाठी निघाल्या. मात्र सोन्याचांदीचे दागिने असलेली पर्स त्या बसमध्ये विसरल्या. वाहक उषा शिंदे यांच्या नजरेस पर्स पडल्यावर त्यांनी ती ताब्यात घेतली. पर्स उघडून पाहिल्यावर त्यांना त्यात सारबेटे पारोळा तिकीट, सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे कानातले, चांदीच्या साखळ्या, जोडवे, आधार कार्ड सापडले. त्यावरील नाव पाहून त्यांनी सारबेटे येथील महिलांजवळ निरोप दिला. रुपाली पाटील बाहेरगावच्या असल्याने त्यांना कोणी ओळखत नव्हते. हळूहळू गावात ही माहिती पसरत गेली आणि रुपाली पाटील यांच्या बहीण वैशाली अनिल पाटील यांना कळताच त्यांनी अमळनेर आगार गाठले. वाहक उषा शिंदे यांनी ती पर्स सुरक्षितपणे आगार प्रमुखांच्या ताब्यात देऊन ठेवली होती. पोलीस उपनिरीक्षक निंबा शिंदे व हेडकॉन्स्टेबल कुमावत यांच्या समक्ष ओळख पटवून रुपाली पाटील यांची बहीण वैशाली यांच्या ताब्यात पर्स देण्यात आली. वाहक उषा शिंदे यांच्या प्रमाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.




