
सर्व शासकीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा, नियोजनाबाबत केल्या सूचना…
अमळनेर:- 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख जवळ येत असल्याने तयारीचा वेग वाढला असुन यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपुर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली.

यावेळी खा शि मंडळाच्या कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा घेऊन नियोजनाबाबत विविध सूचना त्यांनी केल्या.सदर बैठकीत प्रांतधिकारी तथा संमेलनाचे समन्वयक महादेव खेडकर, डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, तहसीलदार सुराणा,पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, खा शी मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील व इतर शाखा अभियंता, मंडळाचे शरद सोनवणे, संदीप घोरपडे,नरेंद्र निकुंभ, बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे,प्रा शिला पाटील, श्रीमती स्नेहा एकतारे,प्राचार्य डॉ ए बी जैन यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी तयारीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका, जबाबदारीचे विकेंद्रीकरण करा आदी सूचना करीत तयारी कुठपर्यंत आली, आता कोणती कामे शिल्लक आहेत याची माहिती जाणून घेतली तसेच केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा दौरा कसा याशिवाय मदतीसाठी सेवेकरी, पोलीस बंदोबस्त,सुरक्षा रक्षक नेमणूक याबाबत सविस्तर चर्चा केली आणि काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या.
संमेलनस्थळाची केली संपुर्ण पाहणी…
मंत्री अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी व म.वा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत संपुर्ण स्थळाची पाहणी केली. यावेळी काही बदल देखील त्यांनी सुचविले. दरम्यान या पाहणी दरम्यान मंत्री पाटील यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवतींशी संवाद साधत त्यांच्यात समेलनाबाबत उत्सुकता देखील वाढवली.




