
अमळनेर:- येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक ७ जानेवारी (रविवार) रोजी टेक्नो वेद आर्ट मेला या उपक्रमाद्वारे विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न झाला.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच परीक्षक डॉ. भाग्यश्री वानखेडे, डी के पाटील, आर.एस.पाटील, जगदीश शांताराम पाटील, डी.ए. धनगर, प्रशांत लोहार, दीपक पाटील, डॉ. लीना चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, शालेय समितीच्या सदस्या सितिका अग्रवाल व मुख्याध्यापक विनोद अमृतकर उपस्थित होते. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी वैज्ञानिकांची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्या भावी वैज्ञानिकांनी आपली मते मांडली. विज्ञान प्रदर्शनात तंत्रज्ञान, आयुर्वेद, विज्ञान, गणित, भाषा, कला या विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित, भाषा, तंत्रज्ञान, कला, आयुर्वेद इत्यादी विषयांबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी प्राणी व त्यांची निवारे, रोपे व त्यांची विभाग, प्राण्यांचे आवाज, विविध चित्रांचे रंगभरण इत्यादी प्रकारचे देखावे प्रदर्शनात बनवून आणले होते. तसेच प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनात जलविद्युत निर्मिती, पूर नियंत्रक यंत्र, अपघात सूचक यंत्र, स्मार्ट सिटी, ध्वनी पासून वीज निर्मिती अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृती मांडण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना स्पष्ट करणारे तक्ते प्रतिकृती इत्यादींचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे भाषा विषयीची आवड, अभिरुची निर्माण करण्यासाठी तक्ते, प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केले होते. त्याचप्रमाणे आयुर्वेद विषयाचे महत्त्व, उपयोग यासंबंधीचे अनेक घटक – उपघटकांचे प्रत्यक्ष सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी त्यांचे फायदे तोटे याविषयीचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुणे व परीक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांची निरीक्षण केले. त्यांचे मते समजून घेतली व त्याचे चिमुकल्यांचे भरभरून कौतुक केले तसेच पालक वर्ग यांनी देखील भेट दिली व सगळ्यांना प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेले तक्ते, प्रतिकृती, प्रयोग बघण्यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय समितीचे सदस्या सितीका अग्रवाल व मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.प्रदर्शनात शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




