
प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांनी काढलेत गौरवोद्गार…
अमळनेर:- येथील नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी म्हणजे लोकप्रतिनिधी नागरिक आणि प्रशासन यांच्यातील उत्तम दुवा होते. मोठ्या जनसंपर्कामुळे नागरिकांचे हक्काचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. पालिकेच्या प्रत्येक उपक्रमात ते अग्रेसरच राहिले असे कौतुकास्पद उदगार उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती सोहळ्यात काढले.

पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी हे दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी ३७ वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन इंदिरा भुवन येथे अमळनेर नगरपरिषदेचे समस्त अधिकारी, कर्मचारी व श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपतर्फे करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू प्रा शिवाजीराव पाटील तर मंचावर माजी आमदार डॉ बी एस पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, जि प सदस्या जयश्री अनिल पाटील, नपचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यासह मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत यांनी परिचय व प्रास्तविक केले.प्रा शिवाजीराव पाटील,डॉ बी एस पाटील,शिरीष चौधरी,जयश्री पाटील,माजी प्राचार्य डॉ एस आर चौधरी, डॉ पी आर शिरोडे,माजी सभापती श्याम अहिरे,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, सोमचंद संदानशीव यांनी मनोगत व्यक्त करताना संजय चौधरी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भावी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.सर्वानी पालिकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात सेवापूर्ती सोहळा प्रथमच होत असल्याचे आवर्जुन सांगितले.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले की, संजय चौधरी यांनी लिपिक पदापासून सेवेचा शुभारंभ करत आपल्या कौशल्याने प्रशासन अधिकारी पदापर्यंत झेप घेतली,दरम्यानच्या काळात नगराध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील त्यांनी चोख सेवा बजावली. पालिकेचा कोणताही उपक्रम असो किंवा कोरोना काळासारखा कठीण काळ असो प्रत्येकवेळी पुढे राहून त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले असून त्यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळे आमचा भार हलका होऊन दिलेले काम जलदगतीने होऊ शकले, खरेतर असे कर्तव्यदक्ष व्यक्ती निवृत्त होऊच नये असे मनापासून वाटते परंतु काही गोष्टींना नाईलाज असतो तरी यापुढेही त्यांना पालिकेशी आम्ही नक्कीच जुळवून ठेऊ असे सांगत पुढील निरोगी आयुष्याच्या त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी अनेकांनी संजय चौधरी व त्यांच्या सौभाग्यवती अंजुषा चौधरी यांच्यावर सत्काराचा वर्षाव केला.यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, सुभाष चौधरी,नाना रतन चौधरी, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, महावीर पतपेढी चे चेअरमन प्रकाशचंद्र पारेख, प्रा ई टी चौधरी, माजी नगरसेवक श्रीराम चौधरी, प्रा अशोक पवार, प्रा शिला पाटील, नगरसेवक प्रविण पाठक, अनिल महाजन , धनंजय महाजन, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, सुकदेव रामदास बडगुजर, न प सेवा निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच नगरपरिषद अधिकारी , कर्मचारी संघटना, शहरातील व्यापारी, समाज सेवी संस्थेचे संचालक, महिला मंच सदस्य,श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व समाज बांधव उपस्थित होते.शेवटी संजय चौधरी यांनी अत्यंत भावुक होत सत्काराला उत्तर दिले. व मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नप कर्मचारी व छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.




