
अमळनेर:- तालुक्यातील हेडावे येथील ग्रामसेवकाची बदली तात्काळ थांबवण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा हेडावे येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुक्यातील हेडावे येथे २० जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आपला पदभार स्वीकारला. या ११ महिन्याच्या काळात तब्बल ३ ग्रामसेवकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामागे सरपंच व त्यांचे पती असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी पत्राद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केला असून ही बदली तात्काळ थांबवावी अन्यथा गटविकास अधिकारी यांच्या दालनात उपोषणाचा इशारा यातून दिला आहे.
सरपंच व त्यांचे पती नियमबाह्य शासकीय कामे करत असून तसेच कुठल्याही कामात ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामसेवकाची बदली सूडबुद्धीने करण्यात आली असून ती थांबवावी अशी विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर विद्यमान सदस्या व माजी सरपंच उषा रवींद्र पाटील,अनिता सुरेश पाटील, कल्पना रवींद्र पाटील, धनराज पोपट पाटील, लोटन पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.




