
सहा मतदान केंद्रांची नावे बदलली, उपविभागीय अधिकारी खेडकर यांची माहिती…
अमळनेर:- विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या २३ जानेवारीपर्यंत ३ लाख ६९० झाली असून शहरातील चार मतदान केंद्रे इमारत नादुरुस्त व धार्मिक स्थळ जवळ असल्याने स्थलांतरित करण्यात आले आहेत. तर सहा मतदान केंद्रांची नावे बदलण्यात आली आहेत. अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.

२३ जानेवारी २०२४ रोजी मतदार यादी अद्ययावत करण्यात आली. १५- अमळनेर विधानसभा मतदार संघात १ लाख ५५ हजार ९४ पुरुष मतदारांची तर १ लाख ४५ हजार ५९४ महिला मतदार आहेत. महिला पुरुष मतदारांचे लिंग गुणोत्तर ९३२ वरून ९३७ पर्यंत वाढले आहे. इतर दोन मतदार नोंदवण्यात आले आहेत. वर्षभरात ८ हजार ५२७ नव्या मतदारांची नोंदणी झाली तर ६ हजार २१६ मतदारांची वगळणी झाली आहे. त्यात सारख्या फोटोवरून ८५८ दुबार मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यातून ३४० वगळण्यात आले आहेत. काहींचे चुकून फोटो लागले होते. तसेच सारख्या नावावरून २ हजार ६० मतदारांची पडताळणी करण्यात आली. त्यात २०४ नावे वगळण्यात आले आहेत. फोटोवरून दुबार नावे वगळण्याची प्रमाण ३९ टक्के तर नावावरून वगळण्याचे प्रमाण १० टक्के आहे.
अमळनेर मतदार संघात शहरात ८१ ,ग्रामीण भागात १८९ तर पारोळा तालुक्यातील ४० गावात ५० असे एकूण ३२० मतदान केंद्रे आहेत.२ हजार २६ दिव्यांग मतदार आढळून आले. तर ८० वर्षावरील ९ हजार ४७८ मतदार आढळून आले. सेवेत असलेले १ हजार ११ मतदार नोंदवण्यात आले आहेत. त्यांना ऑनलाइन मतदान पत्रिका त्यांच्या कार्यालयात पाठवण्यात येईल. त्यांनी त्यांच्या कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत गोपनीय मतदान करून ती पत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवायची असते असेही प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ३२ ईव्हीएम व ३२ विव्हीपॅट प्राप्त झाले आहेत. सर्व ३२० मतदान केंद्रांवर दोन मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मतदारांमध्ये विश्वास तसेच तहसील आवारात नागरिकांसाठी व मतदारांसाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पाटील, अनंत निकम, यशवंत बैसाणे, महेंद्र बोरसे हजर होते.
एखाद्या मतदाराचे नावे दोन ठिकाणी आढळल्यास व दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल
– महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, अमळनेर




