आमलेश्वर नगर भागातील घटना, तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा…
अमळनेर:- दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असल्याने पत्नीने पतीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आमलेश्वर नगरमध्ये घडली. पती सासू व लहान दिर अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविता लोकेश महाजन या महिलेने स्वतःच्या राहत्या घरात २४ रोजी पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. मयताचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मुलीचे वडील रवींद्र सुरेश वळवी (वय ४० रा तळोदा जिल्हा नंदुरबार) यांनी फिर्याद दिली की, लोकेश उर्फ लकी भास्कर महाजन हा नेहमी दारू पिऊन रविताला मारहाण करीत होता. २३ रोजी रात्री ८ वाजता लोकेशने मारहाण करत तिला भुकेले ठेवले. सासू कांताबाई महाजन लोकेशला चिथावणी देत होती व दिर बब्बू भास्कर महाजन हा देखील मारण्यास चिथावणी देत असे, म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला पती, सासू, दिर तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख करीत आहेत.