प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाचा दिला इशारा…
अमळनेर:- अमळनेर तालुक्यातील निम येथील मनरेगाचे असंख्य रोजगारावरील कामगार हे प्रलंबित वेतनामुळे २६ रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत.
बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षलागवड ही योजना प्रभावीपणे यशस्वी राबविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र, लाखो रुपये हे प्रशासनाकडे घेणे बाकी आहेत.तर, दुसरीकडे गावातील रोजगार सेवक व मनरेगा अधिकारी यांचा बेजबाबदारपणामुळे व त्यांचा अनागोंदी कारभारामुळे हे कामगार लाभापासून वंचीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहेत.या पार्श्वभूमीवर योग्य न्याय न मिळाल्यास येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी निम येथील असंख्य मनरेगा रोजगार कामगार आमरण उपोषण च्या तयारीत आहेत.त्याबाबतचे निवेदन देखील पोलिस प्रशासन व संबंधित विभागाला देण्यात आले आहे.
सन २०२१-२२ मध्ये निम ग्रामपंचायत मध्ये बिहार पॅटर्न वृक्षलागवड योजना राबवण्यात आली. तेव्हा २२० लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि वृक्षलागवड देखील करण्यात आली. परंतु यात ग्रामपंचायत, ग्रामरोजगार सेवक आणि पंचायत समितीच्या नरेगा अधिकाराच्या बेजबाबदारपणामुळे प्रत्यक्षात लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. या योजनेचा आढावा घेतल्यास या योजनेअंतर्गत ३ वर्षामध्ये २५२ दिवस रोजगाराची हमी देण्यात आली. वृक्षलागवड व संगोपणासाठी देण्यात आली. निम गावामध्ये योजनेअंतर्गत १९००० पेक्षा जास्त वृक्ष लागवड केली आणि प्रत्यक्षात २२० लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना आता पर्यंत योजनेअंतर्गत १.५० कोटी एवढी मजुरी मिळाली पाहिजे होती परंतू प्रत्यक्षात ३० लाखापर्यंत मिळाली आहे म्हणजे प्रत्येकी फक्त ५० दिवसाची मजुरी मिळाली आहे. या नुकसानाला सर्वस्वी जबाबदार ग्रामरोजगार सेवक आहे असे विस्ताराधिकारी यांच्या चौकशी अहवालामध्ये निष्पन्न झाले आणि त्याची तक्रार लाभार्थ्यांनी वारंवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याकडे केली. जवळपास सहा महिन्यापासून वारंवार पाठपुरावा केला पण आज पर्यंत त्यावर काहीच निर्णय न झाल्याने हे वंचित लाभार्थी प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसणार असल्याचे कळविले आहे.