
संदिप लोहार
पातोंडा ता. अमळनेर:- सप्तशृंगी देवीची प्रतिरूप म्हणून ओळख असलेली, तसेच नवसाला पावणारी व भक्तांचे श्रद्धास्थान असलेली पातोंडासह पंचकोशीतील ग्रामवासियांची ग्रामदेवता लघु माहिजी देवी यात्रोत्सवास गुरुवार दि.२५ जानेवारी पौषशुद्ध पोर्णिमेपासून सुरुवात होत आहे.

दि. २४ रोजी दरवर्षीप्रमाणे चावदसला सकाळी देवी भगवतीचा नगरप्रदक्षिणा पालखी मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रदक्षिणा मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. तर सुहासिनीसह गावकऱ्यांनी पालखीतील फोटो व पादुकांची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी दत्त भजनी मंडळ यांचे सुरेख सुरातील अभंग, तसेच फेटेदारी महिला, विद्यार्थिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी लक्ष वेधून घेतले होते. तसेच काल मानता देणाऱ्यांची गर्दी होती. पौष शु, चतुर्दशीला मानलेला नवस फेडण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. देवीला नैवेद्य म्हणून घराघरांतून वरण व बट्टी रोडग्याचा प्रसाद अर्पण केला जातो तर पौर्णिमेच्या दिवशी भाविकांच्या योगदानातून गुळाचा शिरा महाप्रसादाचे दिवसभर वाटप होणार आहे.
यात्रोत्सवासाठी माहिजीदेवी ट्रस्टने देवी मंदिराला रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, पुजापत्री व व्यावसायिकांना जागा, पार्किंग, नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. पाण्याची सुविधा,परिसर स्वच्छता, महाप्रसादाचे नियोजन, नगरप्रदक्षिणा सोहळा कार्यक्रम आयोजन, साफसफाई ,पथदिवे आदींसाठी माहिजीदेवी ट्रस्टतर्फे पंधरा दिवस अगोदर तयारी केली जात असते. काही गल्ली चौकामध्ये पारंपारिक परंपरेनुसार देवीला मानाचा तगतराव काढण्यात येणार आहेत. आख्यायिका अशी की, प्राचीन काळात देवीच्या मंदिराच्या जागेवर एक मोठा वडाचा वृक्ष होता. या वडाच्या वृक्षाखाली उदासी नावाच्या तपस्वी महाराजांची पर्णकुटी होती. सभोवताली झाडाझुडपांसह पडीक शेतजमीन होती. या शेतजमीनीची मशागत करीत असताना एका शेतकऱ्याला त्रिशूळ आकाराच्या दगडाचे तीन सुरेख असे बाण सापडले. सप्तशृंगी देवीला सात बहिणी होत्या. त्यापैकी सर्वात लहान बहिणीचे नाव माहिजी देवी असे होते. ती सर्वांत लहान असल्याने या देवीला ‘लघुमाहिजी’ असे संबोधले जात असे. या देवीच्या हातात दगडाचा त्रिशूलाच्या आकाराचा बाण होता, या बाणालाच पूर्वी लघुमाहिजी म्हणून ओळखत असे, अशी आख्यायिका पर्णकूटीत वास्तव्यात असलेले उदासी महाराज सांगत असत. तेव्हापासूनच देवीला ‘लघुमाहिजी देवी’ म्हणून ओळखू लागले अशी माहिती गुरव घराण्यातील देवीचे सेवेकरी कृष्णा गालापुरे सांगतात. त्याकाळी देवीचे मंदीर बांधकामासाठी कै भिकारी शेटे यांनी आपल्या स्वमालकीच्या जमीनीतून जमीन दान दिलेली आहे. दानशूर प्रतापशेठजी यांनी देवीचे त्यावेळी सुंदर कळस असलेले मंदिर बांधून दिले आहे. मंदिराच्या आवारात परशुरामाचे मंदिर आहे. मंदिर देवस्थानास महाराष्ट्र शासनाचा तिर्थक्षेत्र योजने अंतर्गत ,२००८ मध्ये क वर्ग तर २०२२ मध्ये ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.




