
विकास देवरे यांची नवे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक…
अमळनेर:- येथील पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची जळगाव नियंत्रण कक्षात अचानक बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागी नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे जिल्ह्यांतर्गत बदलीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी नुकतेच काढले आहेत. त्यानुसार विकास देवरे यांनी काल अमळनेर येथे येऊन आपला पदभार स्वीकारला.विजय शिंदे यांच्या बदलीबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. या महिन्यात एका पोलिसावर झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत त्यांचेही नाव चर्चेत होते. याशिवाय एका राजकीय पदाधिकाऱ्याने देखील एका प्रकरणात त्यांच्या विरुद्ध तक्रार केली होती. शिंदेंनी पदभार घेतल्यापासून सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता अचानक त्यांची बदली झाल्याने काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दरम्यान विकास देवरे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असून त्यांना आगामी काळ निवडणुकांचा असल्याने मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.




