
गझलकार प्रमोद खराडे यांचे मराठी गझल संमेलनात झालेल्या परिसंवादात प्रतिपादन…
अमळनेर:- गझल विस्तारते आहे म्हणजे ती ताकदीची आहे, गझलेपुढे आव्हान नाहीच, गझलकारांपुढे आव्हान आहे. आपली अभिव्यक्ती आपण कसे मांडतो हे आव्हान आहे असे मत गझलकार प्रमोद खराडे (पुणे) यांनी मांडले. खान्देश साहित्य संघातर्फे आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल समेलनात ‛ मराठी गझल : वर्तमान आणि उद्याची आव्हाने’ या विषयावर झालेल्या परिसंवादावर सांगोपांग चर्चा करताना ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
स्व अरुणोदय भाटकर स्मृती परिसंवाद छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. गझल संमेलनाचे प्रास्ताविक खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. परिसंवादात आपले मत मांडताना संजय गोरडे (नाशिक) म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर गझल लिहिली जाते मात्र स्थित्यंतर,अभिजात रचना , काव्य मूल्ये, गुणवैशिष्ट्ये हे आजच्या गझलेत आढळत नाही. ज्यांच्याकडे स्वतःचे तत्वज्ञान नाही तो गझलकार होऊ शकत नाही. गझलेत जिवंतपणा व सहजता आली पाहिजे. तर शांताराम खामकर (अहमदनगर) म्हणाले की, मराठी गझलेला साहित्य दृष्टी मिळणे हे मोठे आव्हान आहे. गझलेबाबत कुठेच एकवाक्यता नाही. गझलेला कवितेच्या दावणीत बांधणे बंद करा. तिचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा. गझलेला साहित्यात विलीन होण्यासाठी परंपरा निर्माण करणे गरजेचे आहे. मराठी ही भाषा नसून संस्कार आहे. ज की झ हा वादाचा नव्हे गमतीचा मुद्दा आहे. एकंदरीत गजल असो गझल प्रवास एकच आहे. अनंत नांदूरकर (खलिश) अमरावती यांनी आपले मत मांडले की, गझल हा वाह पासून आह पर्यंत प्रवास आहे. जिथपर्यंत लेखाचे दुःख तीव्रपणे जाणवत नाही तोपर्यंत लिहीत राहा. इतरांच्या हितासाठी बोध ठरणारे लिखाण म्हणजे साहित्य होय. भाषा संवर्धन शास्राचे आव्हान गझलेपुढे आहे. सोशल मीडिया, फेसबुकवरील वाहवा आणि उतावीळपणा हे मोठे आव्हान आहे. गझलकाराला आपले मत मांडू द्या त्याचे खरे खोटे त्याला परिक्षणातून समजू द्या. परिसंवादाचे सूत्रसंचालन व्यंकटेश कुलकर्णी (हैद्राबाद) यांनी केले. यावेळी शरद धनगर यांनी गझल संमेलनासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल स्वागताध्यक्ष मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सायंकाळी ‛हे जगण्याचे भाषांतर काळजाचा थेट काळजाशी संवाद’ हा गझल गायनाचा कार्यक्रम झाला. गझल गायक राहुलदेव कदम यांनी ‛ काळजाचे रक्त शिंपले…रंगल्या तिथे काही गझल ’ तर संकेत नागपूरकर यांनी ‛टाकून पावले मी माघार घेत नाही…आधार देत जातो आधार घेत नाही’ यासह काही गझल गायल्या. सूत्रसंचालन गझलकार गोपाळ मापारी (बुलढाणा) यांनी केले. त्यांना योगेश संदानशीव तबला , जितेश मराठे हार्मोनियम, स्वराज्य भोसले गिटार यांची साथ मिळाली.
यावेळी खान्देश साहित्य संघाचे डॉ कुणाल पवार, सुनीता पाटील, पूनम साळुंखे, छाया इसे, नूतन पाटील, डी ए धनगर, रेखा मराठे, दत्ता सोनवणे, उमेश काटे, गोपाल हडपे, शरद पाटील, वाल्मिक मराठे, विजय पाटील, रजनी पाटील, रत्नाकर पाटील, प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सहभागी गझलकारांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.




