सर्वांचे सहकार्य व योगदानातून संमेलन यशस्वी होणार-डॉ. अविनाश जोशी…
अमळनेर:- दि 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत येथील पू. सानेगुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असून हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वांचे सहकार्य व योगदानातून साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास 97 व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी प्रताप महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतांना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ अविनाश जोशी,बजरंग अग्रवाल, निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे, नरेंद्र निकुंभ,रमेश पवार, संदीप घोरपडे उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. भराटे यांनी करीत संपूर्ण आढावा मांडला.यावेळी डॉ जोशी अधिक माहिती देताना म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत खान्देशासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. १९५२ या वर्षी ज्या जागेवर साहित्य संमेलन झाले होते, तेथेच पुन्हा संमेलनाचे आयोजन होत आहे. तीन सभा मंडप, ३०० गाळे असलेले भव्य ग्रंथ दालन, खान्देशी खाद्यपदार्थांचे दालन, चित्र प्रदर्शन, सेल्फी पॉईट यांचा समावेश असलेली पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीची उभारणी पूर्ण होत आहे. साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रम दि. २९ जानेवारी पासून सुरु होत आहेत. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम, मराठी, पाऊल पडते पुढे, आमची माणसं आमची संस्कृती, सूर तेचि छेडीता, अशी पाखरे येती या कार्यक्रमांचा समावेश असून अमळनेरसह खान्देशातील कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
कलानंद बालमेळाचा –
दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ५.३० यावेळेत कलानंद बाल मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बाल साहित्यीकांचे कथाकथन, काव्यवाचन, बालनाट्य, असे बालमेळाव्याचे स्वरुप असून मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे यासाठी मंडळाचे पदाधिकारी व शालेय विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन आवाहन करीत आहे.
संमेलनाचे भरगच्च कार्यक्रम…
साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने होणार आहे. वाडी संस्थान पासून ते संमेलन स्थळ असा दिंडी चा मार्ग असेल. दिंडीत चित्ररथ, ढोलताशा पथक, शालेय विद्यार्थी, मंगलवेश परिधान केलेले नागरिक, निमंत्रित साहित्यीक व साहित्यप्रेमी सहभागी होतील. खान्देशी संस्कृतीचा परिचय देणारी आकर्षक ग्रंथदिंडी व्हावी असा प्रयत्न सुरु आहे.
संमेलनात साहित्यीक, सांस्कृतिक व सामाजिक विषयावरील १२ परिसंवाद, निमंत्रितांचे ३ कविसंमेलन, ३ प्रकट मुलाखती, कथाकथन, परिचर्चा, लोकसंगीत, खान्देशी साहित्यीकांचे वैभव, अभिरुप न्यायालय, साहित्यीकांचे शताब्दीस्मरण या कार्यक्रमांचा समावेश आहे. तर दोन दिवस कविकट्टा एक दिवस गझल jकट्टा, तीनही दिवस सायंकाळच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम हे देखील संमेलनाचे आकर्षण असणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सर्वांना प्रवेश खुला असणार आहे.
प्रचाराचे नियोजन…
साहित्य संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलनातील साहित्यीक व सांस्कृतिक कार्यक्रम याची रसिकांना माहिती व्हावी यासाठी बॅनर्स, पत्रक वाटप, शाळा, महाविद्यालयात संपर्क, सोशल मिडिया, एल.ई.डी. व्हॅन व्दारे प्रचार करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा…
साहित्य संमेलनाच्या काळात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभिप्राय स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दोन गटात होणार आहे व विजेत्यांना भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत, या स्पर्धेच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व वाग्विभूती संस्थान, अमळनेर यांनी स्विकारले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन म. वा. मंडळाने केले आहे.
रसिकांनी सहकार्य करावे…
अमळनेर व खान्देशात मोठ्या कालावधीनंतर होत असलेले अखिल भारतीय साहित्य संमेलन साधेपणाने, उत्साही वातावरणात साजरे व्हावे यासाठी स्वागत समिती, खा. शि. मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, म.वा. मंडळाचे पदाधिकारी, सभासद, व्यवस्था समितीतील कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी व अविस्मरणीय व्हावे यासाठी रसिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष आकर्षण…
पू. साने गुरुजींच्या पुतणी सुधाताई साने यांचीही संमेलनात उपस्थिती पु. साने गुरुजींचे अप्रकाशित साहित्याचे याप्रसंगी होणार प्रकाशन,स्वतंत्र प्रकाशन कट्टयावर अनेक पुस्तकांचे प्रकाशन,छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शस्त्र प्रदर्शन,माजी साहित्य संमेलनाध्यक्ष यांचे चित्र प्रदर्शन होणार आहे.
सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले पत्रकार परिषदेस मंडळाचे पदाधिकारी प्रा श्याम पवार, भैय्यासाहेब मगर, स्नेहा एकतारे, प्रा सुरेश माहेश्वरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Related Stories
January 5, 2025