
मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम…
अमळनेर:- शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परिसंवादाचे आयोजन १ रोजी श्री मंगळ ग्रह मंदिर येथे करण्यात आले होते. यात कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी विजय ठाकरे यांनी प्रास्ताविकात कृषी विषयक विविध योजनांची माहिती दिली. मंगळग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील यांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची माहिती सांगितली. कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. किरण मांडवडे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे संगोपन व त्यांच्यासाठी लागणाऱ्या रब्बी चारा पिकाची लागवड आणि नियोजन यासंदर्भात मार्गदर्शन केले. पी.एम.एफ. एम. इ. चे जळगाव जिल्हा संसाधन समाधान पाटील यांनी विविध कृषी आधारित प्रक्रिया उद्योग यावर मार्गदर्शन केले. तसेच कृषी लघु उद्योगांसाठी प्रकल्प अहवाल कसा तयार करावा यावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून उद्योग उभारणी करण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. या परिसंवादामध्ये यशस्वी लघु उद्योजक शेतकऱ्यांनाही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये तालुक्यातील देवळी येथील यशस्वी लघु उद्योजक शेतकरी प्रकाश पाटील यांनी त्यांचा शेतकरी ते यशस्वी लघु उद्योजक (पापड उद्योग) याबद्दल स्वानुभव कथन केला. त्याचबरोबर कल्पनाताई मिस्तरी, कृषी सखी- सेंद्रिय शेती (रडावण) यांनी सेंद्रिय शेती व दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागातील मयूर कचरे, मंडळ कृषी अधिकारी योगेश वंजारी, कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार, योगेश खैरनार, अमोल कोठावदे, राकेश सोनवणे, भूषण पाटील, यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक प्रवीण पाटील यांनी केले आभार कृषी अधिकारी सोनाली सोनवणे यांनी मानले.




