
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार…
अमळनेर:- राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे. उत्तम साहित्य हे चांगला विचार देते, यासाठी ग्रंथवाचन केले पाहिजे, असे आग्रही विचार लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, संमेलनाध्यक्ष तथा ग्रांमीण विकासमंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे संरक्षक तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, संमेलनाचे महाव्यवस्थाप्रमुख बजरंगलाल अगवाल, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष रमेश वंसकर, कार्यवाह प्रा.डॉ.उज्ज्वला मेहेंदळे, सचिव राजेंद्र भामरे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक, कोषाध्यक्ष नीरज अग्रंवाल, अखिल भारतीय महामंडळाचे सदस्य प्रदीप दाते, विलास मानेकर, डॉ.दादा गोरे, डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा.किरण सगर, प्रा.मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार, डॉ.गजानन नागरे, पुरुषोत्तम सप्रे, डॉ.विद्या देवधर, कपूर वासनिक, जयंत कुळकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीतील सभामंडप एकमध्ये उद्घाटन करताना सुमित्रा महाजन यांनी व्यासपीठावरील उपस्थितांची सर्वांची नावे न घेता ‘सभी मेरे अपने’ असे म्हणून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. खान्देशातील मातीला कर्तृत्वाचा सुगंध आहे. पूज्य साने गुरुजी, ना.धों. महानोर यांच्यासारखे कर्तृत्ववान माणसं लाभले आहेत, असेही सुमित्र महाजन यांनी स्पष्ट केले.
प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.रमेश माने यांनी लिहिलेल्या व उत्तराताई केळकर आणि डॉ.अमोघ जोशी यांनी गायिलेल्या ‘माय मराठी नित्य लाविते टिळा’ या गीताने संमेलनाची सुरुवात झाली. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.
पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील म्हणाले, आमचा अमळनेर हा अवर्षणग्रस्त तालुका असताना महामंडळाने साहित्य संमेलन घेण्याचा मान दिला याबद्दल पुनर्वसन व मदतमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आभार मानले. ही संतांची भूमी आहे, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे. जगात पोहोचलेल्या विप्रो कंपनीचे अजिज प्रेमजी, श्रीमंत प्रतापशेठजी यांना विसरुन चालणार नाही. कष्टकऱ्यांना या संमेलनातून पाझर फुटावा, अशी अपेक्षाही मंत्री अनिल पाटील यांनी साहित्यिकांकडून व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे, राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ.भरतदादा अमळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध शाळा- महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, राज्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी, नागरिक उपस्थित होते. संमेलनाचे सहसचिव डिगंबर महाले व मृण्ययी भजक यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला मेहेंदळे यांनी आभार मानले.
वाचन संस्कृती टिकली पाहिजे -अजित पवार

अलीकडे डिजिटल क्रांतीमुळे वाचन संस्कृती बदलली आहे. मात्र वाचन संस्कृती टिकली पाहिजे. कारण त्याची गरज आहे, असे विचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 97व्या साहित्य संमेलनाला डिजिटल टच देण्यात आला आहे. ‘चॅटबॉट’सारख्या तंत्रनाचा वापर यात खुबीने करण्यात आला आहे, अशा शब्दात त्यांनी आयोजकांचे कौतुकदेखील केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरीत होत असलेल्या साहित्य संमेलनाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. साने गुरुजी अमळनेर येथील ज्या तत्त्वज्ञान केंद्रात शिकले, असे तत्त्वज्ञान केंद्र राज्यात क्वचितच दिसेल. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा यांचे काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडायचे आहे.
साने गुरुजींचे स्मारक उभारणार…
साने गुरुजींचे अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात वास्तव्य होते. येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचे ना.अजित पवार यांनी सांगितले. साने गुरुजींच्या नावाला साजेसे असे स्मारक व्हावे, यासाठी राज्य सरकार निधी देईल, असेही ते म्हणाले. यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनादेखील त्यांनी केल्या.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही-प्रा.डॉ.रवींद्र शोभणे

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आग्रही आहे. पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण आग्रही असताना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे, असा प्रश्न पडतो, असे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी उपस्थित केला आहे.
प्रा.डॉ.रवींद्र शोभणे पुढे म्हणाले, साहित्याने काळासोबत चालावे, असे म्हटले जाते. अर्थात यात दोन प्रकार संभवतात. पहिला म्हणजे अगदी समकालिन, वर्तमानकालिन, वर्तमानकालिन समाजवास्तव रेखाटणारे साहित्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बदलत्या काळाचा, वर्तमानाचा विचार न करता, मानवी नात्यातील सनातन मूल्ये आपल्या प्रकृतीने मांडणारे लेखन. अर्थात समकालाचे, वर्तमानाचे साहित्यात चित्रण करताना मानवी नात्यातील सनातन मूल्ये येत नाहीत, असे कुणीही समजू नये. पण काही लेखक समाजातील बदलांकडे पूर्णत: पाठ फिरवून लेखन करतात. अर्थात अशा प्रकारचे लेखन कमअस्सल असते, असेही मानता येणार नाही. मराठी साहित्यात नव्या, ताज्या विषयांना मराठी नाटकांनी अधिक प्राधान्याने रसिकांसमोर आणले. यात अनिल बर्वे हा नाटककार, कादंबरीकार अग्रेसर होता.
साठोत्तरी प्रवाह : नव्या वाटा
मराठीत साठोत्तरी काळात दलित साहित्याचा मोठा प्रवाह वेगाने आला आणि संपूर्ण जाणकार वाचकांचे, रसिकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. युगानुयुगांपासूनची ठसठसती वेदना, दु:ख त्या साहित्यातून व्यक्त होऊ लागले. त्यात व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने इथल्या पारंपरिक मूल्यांना जबरदस्त हादरे देत हे साहित्य एका दशकाच्या आतच प्रस्थापित झाले. या साहित्याचा अमोघ वेग आणि जीवनानुभव पाहता श्रेष्ठ, भारतीय पातळीवरची महाकादंबरी दलित साहित्यातूनच जन्माला येईल, असा विश्वास अनेक जाणकारांनी व्यक्त केला होता. पण जवळजवळ 50 वर्षे उलटूनही या अपेक्षा मात्र त्या साहित्याने पूर्ण केल्या नाहीत, असे तटस्थपणे विचार करता म्हणावे लागते. काही लक्षवेधी कादंबऱ्या नक्कीच या साहित्याने दिल्या. त्या सगळ्यांचा आदराचा विषयही ठरला.
भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न महत्त्वाचे…
जागतिकीकरणाने मराठी भाषासुद्धा शिल्लक राहील की नाही, अशी भीती वर्तविली जाते. या जागतिकीकरणाने जगाच्या पाठीवरील किती बोली संपल्या आणि किती बोली संपायच्या मार्गावर आहेत, याची मोजदाद भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या देशीवादाच्या निबंधात केली आहे. व्यवहाराची भाषा अणि बोलण्याची वेगळी बोली अशी आपल्या बहुतेक समाजाची स्थिती आहे. व्यवहाराच्या भाषेसोबतच उपजीविकेची भाषा अशीही वर्गवारी करावी लागेल. जागतिक बाजारपेठेत तुम्हाला ती भाषा वापरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण भाषिक अभिमानापेक्षा पोटाचे प्रश्न अधिक प्रमाणात महत्त्वाचे असतात. जागतिकीकरण आल्यामुळे खरंच आपल्या भाषा संपणार आहेत का? यावर विचार होणे गरजचे आहे.
काही अपवाद सोडला तर बहुतेक मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या बंद पडलेल्या आहेत. काही आहेत तर त्यात कथा, कविता छापणे बंद झाले आहे. आता कथा-कविता कोण वाचतं? म्हणून वृत्तपत्रांचे मालक प्रश्न विचारतात. बालविभाग बहुतेक बंद झाले आहेत. शाळा-महाविद्यालयात एकांकिका, नाटकांचे प्रयोग बंद झाले आहेत. तेथे पाश्चात्य धर्तीवरील कार्यक्रमांची रेलचेल असते. ग्रंथालयांची स्थिती आणखीच वाईट आहे. याचा संमिश्र परिणाम म्हणून आज मराठी भाषेची, संस्कृतीची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते, असेही प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईत मराठी भाषा भवन -शिक्षणमंत्री दीपक केसरकर…

राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यानंतर त्यांना राहण्याची अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येणार आहे, असे भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरद्वारा आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत दररोज एक तास वाचनावर भर दिला आहे. मराठी भाषा धोरण महिनाभरात जाहीर करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना जगभरातील पालक त्या-त्या ठिकाणच्या मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना दररोज एक तास पाठवतात. महाराष्ट्राबाहेरही बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनांना 25 लाख रुपये निधी देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये अनुदानही देण्यात येईल. मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या कळवा, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.




