
मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथे ग्रामपंचायतीने दारू बंदीचा ठराव केला असून याबाबत मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील तांदळी गावात हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असून गावात या अवैध दारू विक्रीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. परिणामी गावात यामुळे वातावरण दूषित होत असल्याने, कुटुंबात दारूच्या व्यसनामुळे भांडण व तंटे वाढू लागले आहेत. गावात शैक्षणिक वातावरण, महिलांची असुरक्षितता या बाबत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने येथील ग्रामस्थांनी व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दारू बंदीचा ठराव करायला लावला आहे. दारूबंदीचा ठरावाची प्रत व ग्रामपंचायतीचे लेखी निवेदन मारवड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी तात्काळ कार्यवाही करून गावात दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, असाही सुर महिलांनी व्यक्त केला आहे.




