दुहेरी योग साधत भाविकांनी मंगळग्रह मंदिरात केली अलोट गर्दी…
अमळनेर:- श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी अर्थात अंगारक योग त्यातच मंगळवार असल्याने १३ रोजी येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
या पर्व काळानिमित्त मंगळ ग्रह सेवा संस्थेने मंदिरातील श्री गणेशाच्या उत्सव मूर्तीची विशेष पूजा व अभिषेकाचे आयोजन केले होते.नेत्ररोग तज्ञ डॉ.राहूल मूठे व त्यांच्या पत्नी डॉ. बिराज मुठे या महापुजेचे मानकरी होते. दर मंगळवारी मंगळग्रह मंदिरात देशविदेशातून भाविक मोठ्या संख्येने दर्शन, पूजा व अभिषेकासाठी येत असतात. या मंगळवारी श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी अर्थात अंगारक योग जुळून आला. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी हजारोंच्या संख्येने मंगळग्रह मंदिरास भेट दिली. अर्थातच मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. अगदी पहाटे ६ वाजेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. संध्याकाळी ५ वाजता पूर्णाहुती झाली. मंदिर परिसरात सजविलेल्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी ६ वाजता महाआरती झाली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सह सचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी डी. ए. सोनवणे, पी.एल.मेखा,बाळा पवार, जी.एस. चौधरी, राहुल पाटील, उमाकांत हिरे, व्ही.व्ही. कुलकर्णी आदींचे सहकार्य लाभले. मंदिराचे पुरोहित गणेश जोशी व जयेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले.