
अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांची माहिती
अमळनेर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अमळनेरशी विकासाचे नाते जुळले होते. आमदार अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी नगराध्यक्ष स्व सुरेश ललवाणी यांच्या माध्यमातून अमळनेरच्या विकासाला अजित पवारांनी गती दिल्याने याच मार्च महिन्यात बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाजार समिती आवारात अजित पवारांचा शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा उभारला जाईल त्याचे काम पूर्णत्वास आले आहे अशी माहिती कृउबा सभापती अशोक आधार पाटील यांनी दिली.

बाजार समितीच्या बोनस मधून शेतकऱ्यांचा सत्कार
आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मदतीने तसेच खासदार स्मिता वाघ सह उपसभापती , संचालक मंडळ , व्यापारी , सचिव ,कर्मचारी ,हमाल, मापाडी, गुमास्ता यांच्या सहकार्याने अमळनेर बाजार समितीने प्रगतीच्या दिशेने झेप घेतली आहे. शिस्त , पारदर्शीपणा यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. अमळनेर बाजार समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. त्यामुळे पणनच्या कर्जाची नियमित परतफेड करण्यात आली , सुपर्व्हिजन फी , अंशदान आदी बाबींच्या नियमिततेमुळे पणन कडून बाजार समीतीला व्याजाच्या ५ टक्के असा सहा लाखाचा बोनस मिळाला आहे त्यातून याच मार्च महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे असेही अशोक पाटील यांनी सांगितले.
विकास कामाचे उदघाटन
बाजार समितीच्या आवारात १३६ दुकान गाळे बांधण्यात येत आहेत, लेखापाल कार्यालय बांधण्यात आले आहे. पातोंडा उपबाजारात वे ब्रिज बांधण्यात आले आहे. बाजार समितीच्या पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनच्या चार्जिं स्टेशन उभारण्यात आले आहे. तर मारवड उपबाजार समितीत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे या विकासकामांचे उदघाटन करण्यात येणार आहे.
नवीन कामाचे भूमिपूजन
तर शेतकरी भुवन , हमाल मापाडी भुवन , व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज २०० फूट शेड चे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आगामी काळात उन्हाळ्यात लिलावसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोफत थंड पेय ची सुविधा करण्यात येईल तर हिवाळा किंवा पावसाळ्यात मोफत चहा ची सुविधा उपलब्ध असेल. आणि ज्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समिती चालते त्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान वार्षिक सभेत केला जाणार असल्याचेही सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.
असे असेल अजितदादांचे स्मारक
संपूर्ण महाराष्ट्रात अजित दादांवर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. सर्वत्र अजित पवारांच्या स्मारकाची मागणी होत असली तरी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात प्रथम बाजी मारली आहे. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर चौथऱ्यावर बैलगाडी आणि त्यावर शेतकरी रुपात स्व अजित पवार यांचा पुतळा उभा राहणार आहे. सोबत धान्य कापणारा शेतकरी व धान्याचे पोते उचलणारा शेतकरी असे पुतळे असतील. या स्मारकाची एकूण उंची १५ फूट असेल अजित दादांचा पुतळा त्यांच्या उंची एवढाच असेल. हे स्मारक शेतकऱ्यांना आणि अमळनेर तालुक्यातील जनतेला हे स्मारक प्रेरणा , धाडस आणि ऊर्जा देत राहील.




