
पालिकेची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम साहित्य पडून, पालिका प्रशासन सुस्त....
अमळनेर -शहरातील जुन्या बहुतांश भागात गल्ली-बोळे आधीच अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या कायम आहे. त्यातच घरबांधणीसाठी लागणारे वाळू, खडी, सिमेंट, लोखंडी सळई व अन्य साहित्य थेट भर रस्त्यावर टाकले जात असल्याने व ते अनेक दिवस पडून राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष म्हणजे शहरातील अधिक वर्दळीच्या गल्ल्यांमध्येही कोणतीही खबरदारी न घेता रस्त्याचा मोठा भाग व्यापला जात असून पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, सध्या नवीन वसाहती असलेल्या मुंदडा नगर, पिंपळे रोड, ढेकू रोड ,गलवाडे रोड, आर.के.नगर मागील भागात सुरू असलेल्या अनेक बांधकामांसाठी पालिकेकडून रस्त्यावर साहित्य ठेवण्याची परवानगी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. मात्र पालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेकडून ठोस कारवाई होत नसल्याने मालमत्ताधारक व बांधकाम व्यावसायिक बिनधास्तपणे साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. परिणामी आपत्तीच्या काळात रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांच्या मार्गातही अडथळे निर्माण होऊन अपघाताचा धोका संभवतो. पालिकेशी संपर्क केला असता याबाबत परवानगी घेतली जात नसल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली.
शहरातील मालमत्ता धारकांनी व ठेकेदारांनी आपल्या घराचे, शॉपिंग कॉम्प्लेक्सचे, काम करताना पालिकेकडे परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच बांधकाम करताना रस्त्यालगत टाकलेल्या साहित्याची लवकरात लवकर कसे विल्हेवाट लावता येईल, यासाठी बांधकाम परवानगी देतानाच निर्देश द्यावेत याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पालिकेने अशा ठिकाणी तातडीने ॲक्शन घेणे आवश्यक असते. बांधकाम परवानगी देतानाच मालमत्ता धारकास साहित्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होणार नाही, असे निर्देश देणे आवश्यक आहे.
नपा, मनपा अधिनियम व वाहतूक नियमांनुसार सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होईल असे साहित्य टाकण्यास मनाई आहे. आवश्यक असल्यास पालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई व साहित्य जप्तीची तरतूद आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी अभावानेच होत असल्याने नियम केवळ कागदापुरतेच मर्यादित राहिले आहेत.
कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.परवानगी न घेता रस्त्यावर साहित्य टाकणे व त्याची वेळेवर विल्हेवाट न लावणे हा नियमभंग असतानाही प्रत्यक्ष कारवाई होत नाही. क्वचित नोटीस देण्यापलीकडे ठोस दंडात्मक पावले उचलली जात नसल्याने नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया
पिंपळे रोड परिसरातील नवीन वसाहतीतील रस्त्याचा अर्धा भाग वाळू,खडीने व्यापलेला असतो. याबाबत तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही. पालिकेची कारवाई फक्त कागदावरच दिसते, कारवाई होत नसल्याने बांधकाम साहित्य अनेक दिवस रस्त्यांवर पडून राहते.
हर्षल पाटील, नागरिक, पिंपळे रोड परिसर




