
अज्ञात इसमाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे रानडुकरांसाठी ठेवलेले सातही गावठी बॉम्ब नाशक पथकाकडून निष्क्रिय करण्याचे आदेश न्यायाधीश स्वाती जोंधळे यांनी दिले आहेत. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील मांडळ येथे २२ रोजी दुपारी रस्त्यावर ट्रॅक्टरच्या चाकाखाली अचानक स्फोट झाला, तसेच पिठाचे गोळे खाल्ल्याने दोन कुत्र्यांच्या तोंडात स्फोट होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. रानडुकरांसाठी शिकारींनी पोटॅशियम नायट्रेट ,सल्फर आणि चारकोल अशी गन पावडर वापरून गावठी बॉम्ब बनवले होते आणि ते रस्त्यावर फेकलेले आढळून आले. सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही. मात्र या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी गावठी बॉम्ब जप्त करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मारवड पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र हे स्फोटक पदार्थ सांभाळून ठेवणे धोक्याचे असल्याने पंचनामा करून सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी न्या. स्वाती जोंधळे यांच्याकडे गावठी बॉम्ब नष्ट करण्याची परवानगी मागितली होती. न्या जोंधळे यांनी नष्ट करण्यासाठी परवानगी दिली आहे. एकूण सात गावठी बॉम्ब पोलिसांना आढळून आले होते. यामागे कोणाचे कटकारस्थान होते याचा पोलिस शोध घेत आहेत. पुन्हा बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावून सक्षम यंत्रणेच्या उपस्थितीत सातही गावठी बॉम्ब नष्ट केले जातील, अशी माहिती एपीआय नाईक यांनी दिली आहे.




