मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मध्यस्थीनंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे…
अमळनेर:- उपमुख्याधिकारीनी कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषा वापरल्याचा आरोप करत पालिका कर्मचाऱ्यांनी २३ रोजी सकाळी काम बंद आंदोलन केले. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पालिका कर वसुलीच्या कारणावरून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी विजय पाटील यांच्याशी बोलताना असभ्य भाषा वापरली असा आरोप करत सर्व पालिका कर्मचारी कार्यालयाबाहेर आले आणि काम बंद आंदोलन केले. काही वेळातच मुख्याधिकारी तुषार नेरकर कार्यालयात आले. त्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत घालत कार्यालयात चर्चेला बोलावले, कर्मचाऱ्यांना वसुली करणे हे आपले कर्तव्य आहे ते काम करा मात्र संदीप गायकवाड यांचा अनावश्यक हस्तक्षेप होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. यावेळी कर्मचारी यांनी निवेदन देत, गायकवाड हे पाच वर्षांपासून याठिकाणी नोकरीला आहेत. अमळनेर हे त्यांचे सासर असल्याचा आरोप करीत त्यांच्या बदलीची मागणी केली.
निवेदनावर सोमचंद संदानशीव, फिरोजखान फयाजखान पठाण, विजय पाटील, चंद्रकांत शिंगाणे, परशुराम बिऱ्हाडे, शेखर देशमुख, जगदीश चौधरी,जयेश जोशी, दिनेश पाटील,अविनाश संदांनशिव, इकबाल पठाण, शंकरलाल छाबडीया, साजिद शेख, संजय माळी, सुनील पाटील, संजय सोनवणे, भाऊसाहेब पाटील, विजय महाजन, सुभाष अहिरे, समाधान सोनवणे यांच्यासह ६० कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
प्रतिक्रिया…
उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी बोलताना नालायक म्हणत असभ्य भाषा वापरली. इतर कर्मचाऱ्यासोबत बोलताना उपमुख्याधिकारीकडून ही अशीच भाषा वापरली जाते व हा नेहमीचा प्रकार आहे.
– विजय पाटील, वसुली कर्मचारी
प्रतिक्रिया…
वसुली कर्मचारी यांची समजूत काढून मध्यस्थी करत काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. पुन्हा असा प्रकार घडू नये याबाबत उपमुख्याधिकारी यांना समजावले आहे.
– मुख्याधिकारी तुषार नेरकर, नगरपरिषद अमळनेर