
कपिलेश्वरच्या संरक्षक भिंतीसाठी २ कोटी, साने गुरुजींच्या स्मारकासाठीही निधी…
अमळनेर:- राज्याच्या अर्थसंकल्पात अमळनेरला सानेगुरुजी स्मारक, निम्न तापी प्रकल्पाला ९९ कोटी ३९ लाख ७७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
सानेगुरुजी स्मारक समिती गेल्या कित्येक वर्षांपासून अमळनेरला सानेगुरुजींचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करीत होती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सानेगुरुजींच्या कार्याला साजेसे स्मारक अमळनेर ला उभारले जाईल अशी घोषणा केली होती. अर्थसंकल्पावर बोलताना अजित पवारांनी त्याची पुष्टी केली. तसेच निम्न तापी प्रकल्प पाडळसरे साठी ९९ कोटी ३९ लाख ७७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तापी पांझरा नद्यांच्या संगमावर कपिलेश्वर मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी २ कोटी ९६ लाख ४१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती दिली. सानेगुरुजी स्मारकाला शासन निधी देणार असल्याने अमळनेरात आनंद व्यक्त केला जात आहे.




