
मालेगाव संघ ठरला उपविजेता, प्रेक्षकांची उसळली मोठी गर्दी…
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयात अमळनेर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने झालेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होऊन यात पार्थ टेक्स सुरत संघ नामदार चषक व 2 लाख रुपये बक्षिसाचा मानकरी तर मालेगाव संघ उपविजेता ठरल्याने या टीमला चषक व 1 लाख रुपये पारितोषिक मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
शनिवारी झालेला अंतिम सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.विशेष म्हणजे सेकंड ईनिंग मध्ये मंत्री अनिल पाटीलही उपस्थित झाले होते. दुपारी 1 वाजता अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ मैदानावर आलेत,या सामन्याची जय्यत तयारी आयोजकांनी केली होती तर सामना पाहण्यासाठी तरुण वर्ग व क्रिकेट शौकिन सकाळपासूनच मैदानात हजर झाले होते,सुरवातीला नाणेफेक जिंकुन सुरत संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मालेगाव संघाने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 7 गडी बाद127 धावा केल्या,त्यात सर्वाधिक 33 धावा नदीम अन्सारी याने केल्या तर सुरत संघाने 19.4 षटकात128 धावा 6 गडी बाद पूर्ण करत सामना 4 गडी राखून जिंकला. अखेरच्या क्षणी मोठी चुरस निर्माण झाली होती,मात्र अखेर सुरत संघच सरस ठरला, सुरत संघाकडून सर्वाधिक 58 धावा रिधम पटेल याने केल्या व सामनाविराचा मानकरी ठरला. प्रेक्षकांनी प्रचंड मजा करत सामन्याचा आनंद घेतला.
तरुणाईने मंत्र्यांना खांद्यावर घेऊन घेतला ठेका..
सामना आटोपल्यावर आनंदित झालेल्या तरूणाईने विजयी संघाच्या खेळाडुसह उपस्थित असलेले मंत्री अनिल पाटील यांना खांद्यावर घेऊन ठेका धरत जल्लोष केला मंत्री पाटील यांनीही तरुणाईला आनंद देण्यासाठी उत्तम प्रतिसाद दिला यानंतर विजेता व उपविजेता टीमला मंत्री पाटील यांच्या हस्ते नामदार चषक व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.तर संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून नदीम अन्सारी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून पार्थ जैन तर मालिकवीर म्हणून सिद्धार्थ खेणी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच नामदार चषक भरविणाऱ्या अमळनेर क्रिकेट असोसिएशनचे अभिषेक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांसह मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, खा शी मंडळाचे संचालक योगेश मुंदडा,नीरज अग्रवाल,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,प्रा दिलीप भावसार,अर्बन बँक संचालिका सौ वसुंधरा लांडगे यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष अभिषेक पाटील,आणि त्यांचे सर्व सहकारी तथा अमळनेर क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
पुढील वर्षी 5 लाखांचे बक्षीस :- मंत्री अनिल पाटील…
यंदाच्या नामदार चषकात तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद व उत्साह पाहून पुढील वर्षीच्या स्पर्धेत प्रथम बक्षीस 5 लाखांचे असेल अशी घोषणा मंत्री अनिल पाटील यांनी केली यावेळी उपस्थितांनी चषक कोणता असेल असे विचारले असता तुम्ही पुन्हा आमदार केल्यास मंत्री मात्र अजितदादाच करतील त्यामुळे पुढचाही नामदार चषकच असेल असे सांगितल्याने तरूणाईने एकच जल्लोष केला.




