
३०० थकबाकीदारांच्या नावे पोस्टकार्ड लिहीत कर भरण्याचे केले आवाहन…
अमळनेर:- येथील नगरपरिषदेच्या वसुली कर्मचाऱ्याने वसुलीसाठी थकबाकी दारांच्या नावाने ३०० पोस्टकार्ड लिहून कर भरण्यासाठी आवाहन केले आहे.
अमळनेर नगरपरिषदेची नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीची रक्कम प्रलंबित असून नागरिकांना तशी बिले देखील दिली गेलेली आहेत परंतु तरी देखील नागरिक पैसे भरायला तयार नाहीत. नागरिकांना यापूर्वी नोटीसा देखील दिल्या गेलेल्या असून नागरिकांची कर भरण्याच्या बाबतीत उदासीनता दिसून येत असल्यामुळे वसुली विभागातील वरिष्ठ लिपीक सोमचंद संदानशिव यांनी ढेकूरोड, पिंपळे रोड, गलवाडे रोड दाजीबा नगर भागातील थकबाकीदार मालमत्ता धारकांना त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीच्या रकमेसाठी ३०० पोष्टकार्ड लिहून थकीत कर भरण्याचे आवाहन केले असून त्यांच्या या कामाचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी देखील कौतुक केले असून नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या थकीत कराचा भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करून नळ कनेक्शन बंद, जप्ती या सारख्या कारवाया नगरपरिषदेस करावयास लागू नये असे आवाहन केले आहे




