
सहा दिवस चालणाऱ्या साहित्योत्सवात देशभरातून ७०० साहित्यिक येणार…
अमळनेर:- नवी दिल्ली येथील रविंद्र भवन परिसरात दि. 11 ते 16 मार्च दरम्यान साहित्य अकादमी आयोजित “साहित्योत्सव” (फेस्टिवल ऑफ लेटर्स) 2024 या जगातल्या सर्वात मोठ्या साहित्य महोत्सवात तालुक्यातील करणखेडे येथील शेतकरी कवी तथा गझलकार शरद धनगर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सहा दिवस चालणाऱ्या या साहित्योत्सवात देशभरातून 700 कवी, विचारवंत साहित्यिक व साहित्य अभ्यासकांव्दारा 100 हून जास्त भाषा व बोलीभाषेतून आपल्या कविता, गझल व परिसंवादातून आपले विचार मांडणार आहेत. यापूर्वी सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या हॉट सीटवरून शरद धनगर यांनी अहिराणी भाषेत कविता सादर केल्या होत्या. आता नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय साहित्योत्सवात यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त उर्दू भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक गुलझार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात शरद धनगर यांना अहिरानी बोलीभाषेतील कविता सादरीकरण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शेती-माती व सामान्य माणसाच्या कथा अन् व्यथा आपल्या कविता व गझलेतून मांडणारे सुप्रसिद्ध कवी शरद धनगर यांच्या या निवडीबद्दल खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, अहिराणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, अमळनेर येथील सरपंच परिषद अध्यक्ष महेंद्र बोरसे, पत्रकार चेतन राजपूत, संजय पाटील, जितेंद्र ठाकूर, महेंद्र रामोशे, उमेश काटे, रमेश बोरसे, डॉ . कुणाल पवार , सौ.सुनिता पाटील, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्राचार्या रत्नाताई पाटील, जगदिश देवपूरकर, रत्नाकर पाटील, शरद पाटील, गोपाल हडपे यांच्यासह खान्देश साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी व साहित्यिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.




