
शहरात सानेनगरात उत्साहात झाला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम…
अमळनेर:- महाशिवरात्री निमित्त शहर व तालुक्यातील सर्वच शिव मंदिरात काल दिवसभर प्रचंड गर्दी होऊन दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.सालाबादप्रमाणे याही वर्षी सानेनगर भागातील सोन्याच्या महादेव मंदिराच्या वतीने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला.
सानेनगर भागात काल सायंकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. 40 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून यावर्षी भगत मच्छीन्द्र श्रीराम पाटील,खाचनेकर यांनी बारा गाडे ओढले, तसेच याठिकाणी अखंड हरिमान सप्ताह देखील आयोजित केला असून यावर्षी अखंडितपणे 30 वे वर्ष आहे,12 रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन समारोप होणार आहे.
दरम्यान शहरात इतर सर्वच मंदिरे आकर्षक सजविण्यात आली होती,व सर्वच भागात महादेवाचा गजर होत होता,पहाटे पासूनच पूजा अर्चा व धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली होती, सकाळी सात नंतर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या,प्रामुख्याने ग्रामिण भागात कपिलेश्वर, शिवधाम, तर शहरात वर्णेश्वर, खळेश्वर, खाटेश्वर, तांबेपुरा भागातील सोन्याचा महादेव आदी मंदिरात प्रचंड गर्दी होऊन दर्शनासाठी बराच वेळ लागत होता.कपिलेश्वर येथे कालपासुन यात्रोत्सवाचा शुभारंभ झाला. अनेक मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी व उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.न्यू प्लॉट भागातील महादेव मंदिरात उद्योजक अशोक मणियार व कुटुंबीय व भक्तांतर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले.जवळपास सर्वच भागात आता शिवालये झाल्याने एकंदरीत महा शिवरात्री मुळे सर्वत्र परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाल्याचे काल पाहायला मिळाले.




