
अमळनेर:- महिला दिनाचे औचित्य साधून दर्शना पवार यांचे स्त्री-पुरुष गरज दोघांची या विषयावर तालुक्यातील चांदणी कुरहे खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 12 मार्च रोजी जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली अमळनेरतर्फे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हंसराज सोनवणे, सुषमा सुर्यवंशी, श्रीमती वैशाली पितृभक्त, श्रीमती नंदा बोरसे तसेच जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली अमळनेरच्या अध्यक्षा दिपिका सोनवणे, सचिव शोभा पाटील उपस्थित होत्या. यावेळी दर्शना पवार म्हणाल्या की घरातल्या वरिष्ठ मंडळींनी लहानपणापासूनच मुलगा आणि मुलींमध्ये समतेचे संस्कार करावे. स्त्रियांनी त्यांचे बाईपण आणि पुरुषांनी त्यांचे पुरुषपण सोडून माणूसपणाकडे वाटचाल करावी. आणि यासाठी सर्वांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील तरच स्त्री पुरुष समता समाजात साध्य होईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका दर्शना पवार यांनी केले.तसेच अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून देत मुलांकडून गीत म्हणून घेत नृत्य करून घेतले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नंदा बोरसे यांनी केले,तर मनोगत व्यक्त करताना दिपिका सोनवणे यांनी सांगितले की, जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक पातळीवर याच्यावर विचार करत नाही तोपर्यंत स्त्री-पुरुष समानता ही फक्त वाचण्यातच राहील. स्त्रिया करत असलेल्या घर कामांना मूल्य असते याची भान सर्वांनी ठेवायला हवे. या कार्यक्रमास महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.




