
कार्यकर्त्यांचा जल्लोष, न्याय मिळाल्याची व्यक्त केली भावना…
अमळनेर:- जळगाव लोकसभेची भाजपची उमेदवारी माजी आमदार स्मिता वाघ यांना मिळाल्यानंतर अमळनेरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. योग्य न्याय मिळाल्याने हा आनंद व जल्लोष करत असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
टीव्हीवर आणि अधिकृत यादीत भाजपतर्फे जळगाव लोकसभेला स्मिता वाघ याना उमेदवारी जाहीर होताच बाजार समिती संचालक प्रफुल्ल पाटील, पंचायत समिती माजी सभापती श्याम अहिरे, माजी शहराध्यक्ष शीतल देशमुख, उमेश वाल्हे, राकेश पाटील, चंद्रकांत कंखरे, पंकज भोई, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार, शिवाजी राजपूत, साखरलाल महाजन, सतीश पाटील, योगीराज चव्हाण, रावसाहेब पाटील, राहुल कंजर, भावेश जैन, राहुल बडगुजर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्व. उदय वाघ यांच्या स्मारकावर जाऊन जल्लोष केला. यावेळी एकच भाऊ गिरीश भाऊ अशा घोषणाही देण्यात आल्या. गेल्यावेळी स्मिता वाघ याना दिलेली उमेदवारी ऐनवेळी काढून घेण्यात आली होती. त्यावेळी कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. मात्र यावेळी न्याय मिळाला असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
हे तर एकनिष्ठतेचे फळ :- स्मिता वाघ…
भाजपशी निष्ठा कायम ठेवली सातत्याने पक्षवाढीसाठी कार्य केले. गेल्यावेळी उमेदवारी कापली तरी नाराज न होता आणि कुठल्याही लोभाला बळी न पडता पक्षकार्य हेच ध्येय कायम ठेवल्याचे हे फळ आहे.
:-स्मिता वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप




