
नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांना लागली गणिताची गोडी…
अमळनेर:- येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची अनुभूती मिळत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी व आनंददायी पद्धतीने त्यांना शिक्षण घेता यावेत यासाठी विविध उपक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या आनंदातून शिक्षण देण्याचे कार्य घडत आहे. दररोज विद्यार्थ्यांना नवनवीन आव्हाने देऊन ते पूर्ण करून सरस ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संस्थाचालक मुख्याध्यापक अथवा शिक्षक सेल्फी काढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागून प्रत्यक्ष कृती करून अध्ययन अनुभूती, आनंददायी पद्धतीने मिळत आहे.
त्याकरिता संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने गणित शिक्षक ज्ञानेश्वर धनगर हे विविध उपक्रम राबवत आहेत. नियमित शिक्षण पद्धतीपेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीयुक्त अथवा ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण दिल्यास ते विद्यार्थ्यांना अधिक लवकर रुजवण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण तर मिळतेच परंतु कृती करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संकल्पना अथवा संबोध नीटपणे समजतात. तसेच ते समजलेले संबोध दीर्घकाळ त्यांच्या स्मरणात राहतात. दैनंदिन पद्धतीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने अध्ययन कृती घेत असताना 21 व्या शतकातील कौशल्य, बहु बुद्धिमत्ता, ब्लुम्स टेक्नॉलॉजी, शिक्षणाच्या सहा पायऱ्या या सर्व पातळ्यांवर काम होणे गरजेचे आहे. त्यातून अध्ययन अध्यापनाची सर्वोच्च पातळी गाठणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः वाचून समजून घेऊन अध्ययन कृती करणे अपेक्षित आहे. तेच उद्दिष्ट साने गुरुजी विद्यालयात होताना दिसत आहे.
आजवर गणित प्रभावीपणे समजण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात आकडेमोडीचे कौशल्य, गटचर्चा , सेल्फीचा फंडा, कृतीयुक्त पद्धतीने गणित शिकणे, शैक्षणिक साहित्याच्या मदतीने गणिताचे विस्तार सूत्र शिकणे, आदी उपक्रम राबवले आहेत.
सर्वसाधारणपणे द्विमित आकृत्यांचे क्षेत्रफळ विद्यार्थी सूत्रांच्या साहाय्याने काढतात. परंतु ज्या वेळेस त्रिमित आकृत्या समोर येतात त्यावेळेस विद्यार्थी त्याचे पृष्ठफळ अथवा घनफळ काढताना गोंधळतात. कारण दृश्य स्वरूपात न दिसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. परंतु एखादी गोष्ट जर आपण प्रत्यक्ष बघत असू तर त्यावरील संकल्पना समजून घेणे खूप सोपे जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः त्रिमित आकृत्या बनवल्या. त्यावरून विद्यार्थ्यांना पृष्ठफळ काढणे सोपे झाले. वर्गातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेले आव्हान सहज पेलले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती संकल्पना तर समजलीच परंतु इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ते समजावून सांगू लागले. आरुष हेमंत बाविस्कर, यशोदीप महेश पाटील, पार्षद प्रवीण महाजन, गौरव जितेंद्र बारी व आदित्य नंदू चौधरी या विद्यार्थ्यांनी दिलेले आव्हान पूर्ण केले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची सेल्फी संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी विलास रतन चौधरी व उपक्रमशील गणित शिक्षक ज्ञानेश्वर आधार धनगर यांच्या समवेत घेण्यात आली. काढलेली सेल्फी वर्गातील सर्व व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. आपणही दिलेले आव्हान पूर्ण केले असते तर आपली ही सेल्फी निघाली असती याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली.
अशा या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल गणित शिक्षक ज्ञानेश्वर धनगर यांचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.




