
बँकेच्या खात्यातून सुमारे एक लाख रुपये केले लंपास…
अमळनेर:- ऑनलाईन कुर्त्याची ऑर्डर एका महिलेला चांगलीच महाग पडली असून तिच्या स्टेट बँकेच्या खात्यातून सुमारे एक लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत.
अमळनेर शहरातील योगिता राकेश भामरे या महिलेने २२ नोव्हेंबर रोजी साडे दहा वाजता फेसबुकवरून ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या एका अकाउंट वर कुर्त्याची ऑर्डर केली. २ डिसेंबर रोजी ते पार्सल घरच्या पत्त्यावर येणार होते, ते आले नाही म्हणून महिलेने गुगलवर कुरियर ट्रेकिंग लिस्ट हा पर्याय निवडून पार्सल का आले नाही ? म्हणून विचारणा केली असता गुगलवरील क्रमांकावरून प्रत्युत्तर दिले की तुमचे पार्सल येण्यास अडचण निर्माण झाली आहे. तुम्हाला पार्सल लवकर हवे असल्यास तुम्ही आमची फाईल क्लिक करून दोन रुपये आमच्या खात्यावर पाठवा. योगिता भामरे यांनी दोन रुपये पाठवले. ५ डिसेंबर रोजी त्यांच्या मोबाईल वर त्यांच्या खात्यातून ९० हजार व ४ हजार ४९० रुपये कपात झाल्याचा संदेश आला. तसेच पोस्टातून पार्सलही आले होते.त्यांनंतर महिला व तिचे पती यांनी स्टेट बँक, आरबीआय, व केंद्रीय सायबर गुन्हे शाखेत ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. मात्र पैसे परत आले नाहीत. म्हणून पुन्हा स्टेट बँकेत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, पोलिसात तक्रार केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाहीत म्हणून योगिता भामरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.




