
नागरिकांचा विरोध,महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप…
अमळनेर:- जळगाव जिल्ह्यात भडगाव येथे नव्यानेच मंजुर झालेल्या आरटीओ कार्यालयाला अमळनेर तालुका जोडण्याचा घाट रचला गेला असून यास नागरिकांचा जोरदार विरोध होत असताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आक्षेप घेत अमळनेर प्रांताधिकारीना निवेदन देत अमळनेर तालुका पूर्वीप्रमाणे जळगाव येथील कार्यालयालाच जोडलेला राहू देण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, अमळनेर तालुका हा पुर्वीपासूनच जळगांव आरटीओ कार्यालयास जोडलेला आहे. महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यात भडगावं येथे नवीन विभागीय आरटीओ कार्यालय निर्माण केल्याने अमळनेर हे भडगावं आर.टी.ओ कार्यालयास जोडण्यात आले.परंतु यामुळे अमळनेर तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे. कारण भडगांव येथे जाण्या-येण्यासाठी पाहिजे तशी सुविधा नाही. तसेच जळगाव हे जिल्हयाचे ठिकाण असून सर्वसामान्य लोकांची इतर कामे जसे की जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर महत्त्वाचे ऑफिसची कामे देखील एकाच दिवशी एकाच ठिकाणी करु शकतात. तसेच तेथून येजा करण्यासाठी रेल्वे, बस व इतर सुविधा मुबलक असल्याने जळगांव हे गैरसोईचे होत नाही.मात्र आरटीओ भडगाव झाल्यास नवीन वाहन जळगांव येथील शोरूम मध्ये घ्यावे लागेल व त्याला पासिंगसाठी भडगांव येथे घेवून जावे लागेल. त्यानंतर नागरिकांना अमळनेरला यावे लागेल. यामुळे नागरीकांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागेल. म्हणुन यासाठी अमळनेर तालुका हा पुर्ववत जळगांव आरटीओ जोडण्यात याव्या, अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन बाळु पाटील, शिवसेनेचे उपशहर प्रमुख अनंत रमेश निकम,कुणाल सुर्यवंशी, दुर्गेश सुभाष पवार, सचिन निंबा वाघ, महेश ठाकरे, किशोर पाटील, नाना पाटील, नारायण पाटील, नरेंद्र पाटील, शकील मुजावर, कैलास पाटील, शालीक साळुंखे, सुशील सोनार, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, अमित जगताप, मदन पाटील, अनिल पाटील, कैलास कांबळे, इम्रान पठाण, गोपाळ वानखेडे, धनराज पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते.




