
अमळनेर:- तालुक्यातील हेडावे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक हे चार्ज सोडण्यास तयार नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर ग्रामसेवक जे. व्ही. पाटील यांच्या विरोधात याआधी ही ग्रामस्थांनी तक्रारी केल्याने त्यांच्या जागी गुरुदास भोई यांना नेमणुकीच्या ऑर्डर बीडीओंनी दिली. मात्र ग्रामसेवक जे. व्ही. पाटील हे चार्ज सोडायला तयार नसल्याने सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी २१ रोजी बीडीओंना निवेदन दिले असून या निवेदनात सदर ग्रामसेवक हे मासिक मिटिंगांना गैरहजर राहतात, पाणीपट्टी व घरपट्टी भरल्याच्या पावत्या देत नाहीत तसेच अपंगत्वाचे कारण पुढे करून खोटे गुन्हे दाखल करतात असे आरोप केले आहे. सदर ग्रामसेवकाने चार्ज न सोडल्यास २२ रोजी पंचायत समितीसमोर सर्व ग्रामस्थ मिळून जनआंदोलन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदनावर सरपंच मनीषा भास्कर पाटील, उपसरपंच गुलाब धोंडू पाटील, सदस्य कैलास बागुल, इरोपा पाटील, मा. पो.पा. सुरेश ढीवरे, ग्रामस्थ कुंदन पाटील, दिलीप पाटील, रेखा पाटील, सरला पाटील, भीमराव पाटील, भीमराव पाटील, यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
प्रतिक्रिया…
सदर प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून त्वरित कार्यवाही केली जाईल तसेच ग्रामस्थांशी बोलून मार्ग काढण्यात येईल.
:- सुशांत पाटील, गटविकास अधिकारी, अमळनेर




