पोलिसांत पाच जणांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील लोण बु. येथील झालेल्या हाणामारीत दुसऱ्या गटातर्फे देखील पाच जणांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोण बु. येथील एक महिला भांडणाची चौकशी करण्यासाठी किसन पाटील यांच्या घरी गेली असता बापू हिलाल पाटील, हिलाल भटा पाटील, सुशील निंबा पाटील, निलाबाई हिलाल पाटील, साधना बापू पाटील हे हातात लाठ्या काठ्या व लोखंडी सळई घेऊन आले. कारण नसताना मला व देराणी शोभाबाई किसन पाटील यांना शिवीगाळ सुरू केली त्यावेळी सुशील निंबा पाटील याने फिर्यादी महिलेचा हात धरून विनयभंग केला. बापू हिलाल पाटील याने लोखंडी सळईने शोभाबाई हिला मारहाण केल्याने तिच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला. तर हिलाल पाटील याने फिर्यादी महिलेच्या हातावर काठी मारली. निलाबाई हिलाल पाटील व साधना बापू पाटील यांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादी वरून पाचही जणांविरुद्ध विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.