टाऊनहॉल येथे आयोजन, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य…
अमळनेर:- शहरातील नाभिक समाजातील ज्या विद्यार्थी मुला-मुलींनी वार्षिक परीक्षा २०२३ मध्ये नेत्रदिपक यश संपादन करुन समाजाचे नावलौकिक उंचावलेले आहे, अशा विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी येथील समस्त न्हावी पंचमंडळातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन २३ रोजी दुपारी २.०० वाजता पू. साने गुरुजी वाचनालय (टाऊनहॉल) येथे करण्यात आले आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.
पारितोषिक वितरण इयत्ता १ ली ते ९ वी (लहान गट), इयत्ता १० वी ते सर्व शाखांमधील पदवी पर्यंत (मोठा गट) आणि सर्व प्रकारचे खेळ, संगित, अभिनय, नृत्य, चित्रकला, अतिउच्च शिक्षणातून नोकरी प्राप्त, विविध पुरस्काराने सन्मानित अशा तीन गटात होणार आहे. त्यात आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे, शास्त्रीय संगित शिक्षक तुषार देवरे, आयटी इंजिनियर भुषण ठाकरे, रेल्वे स्थानक व्यवस्थापक विशाल सोनवणे, उच्चशिक्षित शुभम सुर्यवंशी, आदर्श शिक्षक भगवान सोनवणे, सतिलाल बोरसे, अहिराणी गित संगीतकार तुषार सैंदाणे, संगीत व अभिनय क्षेत्रातील उगवता अभिनेता चि. अक्षर ठाकरे यांचा विशेष सत्कार होणार आहे. तसेच डॉ. डिगंबर महाले यांच्याहस्ते पंच मंडळ अध्यक्षांचा सत्कार होणार आहे.
पुरस्कार वितरणाचे मानकरी धनदाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील हे आहेत. सदर कार्यक्रमास मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सौजन्य लाभले असून समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन समस्त न्हावी पंच मंडळाचे अध्यक्ष कैलास सैंदाणे, उपाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, सचिव दिपक खोफ्लडे, खजिनदार भारती सोनवणे, सह खजिनदार सदाशिव सैंदाणे, कायदेशीर सल्लागार ॲड. दिनेश पाटील यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले आहे.