
निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी खेडकर यांचे आवाहन…
अमळनेर:- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ६ ते ९ महिने गर्भवती महिला आणि ० ते महिने प्रसूत महिलांना मतदान करता यावे म्हणून अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी मदत करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मार्गदर्शन करतांना केले.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, आचार संहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रशासन जातीने दखल घेत आहे. विधानसभा मतदार संघातील पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या स्वतंत्र बैठका उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ग स हायस्कूल मध्ये घेण्यात आल्या.
नुकत्याच प्रसूत महिलांच्या बाळासाठी मतदान केंद्राशेजारी पाळणाघर असेल त्यांची आणि गर्भवती महिलांची माहिती घेऊन अशा महिलांना मतदान केंद्रापर्यंत आणून त्यांना आवश्यक मदत अंगणवाडी सेविका आणि आशा ताईनी करावी असे आवाहन करण्यात आले.
तर पोलीस पाटलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना खेडकर म्हणाले की, ८५ वर्षाच्या वरील वृद्ध आणि अंथरुणाला खिळलेले लोकांची माहिती घेऊन ठेवा, आचारसंहिता अमलबजावणीसाठी गावातील झेंडे, बॅनर्स, होर्डिंग ,कटआउट तातडीने काढून आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, गावात कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखली जाईल यासाठी दक्ष असावे असेही ते म्हणाले. या बैठकांना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके हजर होते.




