
अमळनेर:- तालुक्यातील निम व भरवस येथे गावठी दारूच्या अड्ड्यांवर मारवड पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता निम येथे पांझरा व तापी नदीच्या काठावर काटेरी झुडुपात राजेंद्र दगा भिल हा गावठी दारू निर्मिती करीत असताना दिसून आला. पोलीस येत असल्याची चाहूल त्यास लागताच त्याने तेथून मुद्देमाल सोडून पळ काढला. सदर जागेवर जिवंत हातभट्टी व १० हजार रुपयांचे दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन व नवसागर, गूळ मिश्रित कालवण केलेल्या साहित्याचा पंचनामा करून नमुना घेऊन रसायन जागीच नष्ट करण्यात आले. हवालदार सुनील तेली यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र दगा भिल याच्या विरुद्ध दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत.
तसेच तालुक्यातील भरवस येथे रोहिदास दिवाण पवार हा दारू भट्टी रचून दारू निर्मिती करत असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता चाहूल लागल्याने रोहिदास पळून गेला. त्याठिकाणी दारू निर्मितीचे साहित्य आणि ३६० लिटर कच्चे रसायन मिळून आले. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. रोहिदास पवार याच्या विरुद्ध मारवड पोलीसात दारूबंदी कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




