होळीच्या दिवशी दुर्घटना घडल्याने परिसरात पसरली शोककळा…
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराची होळी होऊन घरातील कर्त्या व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना होळीच्या दिवशी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली.
दिलीप नामदेव पाटील यांच्या घरात २५ रोजी सायंकाळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीचे लोळ उठले. घराचे छत लाकडी असल्याने आणि घरात कापूस साठवून ठेवला असल्याने सर्व घराने पेट घेतला. दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि नात तातडीने घराच्या बाहेर पळत आले. मात्र दिलीप पाटील यांचा पाय अडकला की चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. ते घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते मात्र आगीचे प्रमाण भयंकर वाढल्याने त्यांचा बाहेर पडण्याचा प्रयत्न असफल ठरला. ताबडतोब सारे गाव जमा झाले होते. जो तो मिळेल त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न करून दिलीप पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत दिलीप पाटील यांचा होरपळून मृत्यू झाला होता. नगरपालिकेचे अग्निशमन बंब मागवण्यात आला. पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. १०८ रुग्णवाहिका बोलावून दिलीप पाटील यांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस पाटील मीना महाजन व गावकऱ्यांनी सहकार्य केले.