अमळनेर:- तालुक्यातील आर्डी आनोरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती आली आहे.
तालुक्यातील आर्डी आनोरे येथील सरपंच किशोर एकनाथ पाटील व उपसरपंच उषाबाई शिवदास पाटील या दोघांवर वंदना पाटील, वर्षा पाटील, ललिता पाटील, पुष्पाबाई पाटील, नरेंद्र पाटील, बारकू भिल, प्रकाश वानखेडे यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सरपंच व उपसरपंच यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आम्हाला अविश्वास प्रस्तावावर आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही म्हणून सरपंच निवडीला स्थगिती मागितली होती. १३ मार्च रोजी सरपंच निवड सभेला सर्व सदस्य असताना ऐनवेळी उच्च न्यायालयाच्या न्या एस जी मेहरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला आणि सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती दिली. सरकारी वकिलांनी तातडीने तहसीलदारांशी बोलणे करून सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती दिली. तहसीलदारांनी मंडलाधिकारी पी एस पाटील यांना उच्च न्यायालयाचा संदर्भ देत तोंडी आदेशाने सरपंच निवड स्थगित केली आहे. त्यामुळे सरपंच निवड अनिश्चित झाली आहे.