इतर दोघांना पाच वर्षाची शिक्षा, अमळनेर सत्र न्यायालयाचा निकाल…
अमळनेर:- बहिणीला पळवून घेऊन जाणाऱ्या चोपडा येथील प्रियकराला गोळ्या मारून ठार मारणाऱ्या व बहिणीचा गळा दाबून जीवे ठार मारणाऱ्या पाच जणांना अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर दोन जणांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
१२ ऑगस्ट २०२२ रोजी राकेश संजय राजपूत (रा रामपूरा चोपडा) हा रात्री साडे आठ वाजता सुंदरगढी येथील वर्षा समाधान कोळी हात धरून आरडाओरड करीत माझ्याशी लग्न कर म्हणत पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी एक (विधी संघर्ष बालक), त्याचा भाऊ तसेच तुषार आंनदा कोळी आणि मित्र भरत संजय रायसिंग हे बाहेर आले. तुषारने राकेशची गच्ची पकडली. तेव्हा त्यांच्या दोघात भांडण सुरू झाले. राकेश शिवीगाळ करू लागल्याने सर्वांनी त्याला मारहाण करून घरात नेले. तेथे त्याला रुमालाने तोंड बांधून अल्पवयीन मुलाने त्याला मोटरसायकलवर बसवले आणि मागे भरत रायसिंग याला बसवले. तसेच बहीण वर्षा हिलाही मारहाण करून तिला मावसभाऊ तुषार कोळी हिच्या मोटरसायकलवर बसवले आणि मागे दुसऱ्या अल्पवयीन याला बसवले. दोघांनी मोटारसायकली चोपडा वराड रस्त्यावर जाऊन वराड फाट्यावर थांबवले. त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते. राकेश झटका देऊन पळून जाउ लागला. त्याला नाल्यात पकडल्यानंतर तो पुन्हा झटका देत असताना अल्पवयीन मुलाने हातातील गावठी पिस्तुलने राकेशला गोळी मारली. त्यानंतर तुषार ने करणच्या हातातून पिस्तुल घेऊन राकेशच्या डोक्यात गोळी मारली. राकेश तडफडत असताना वर्षा प्रतिकार करू लागल्याने अल्पवयीन याने हातातील रुमालाने तिचा गळा दाबला आणि तिचा आवाज व हालचाल बंद झाली. करण यानेच स्वतः चोपडा पोलीस स्टेशनला स्वतःहून गुन्ह्याची कबुली देऊन फिर्याद दाखल केल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ॲड. नितीन मंगल पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेल मध्ये सल्ला दिला की, विधी संघर्ष बालक याला फिर्याद देण्यास सांगून त्याच्या हातात बंदूक दाखवली आणि काही पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिला. ही बाब पोलिसांच्या चौकशीत उघड आली. तर रवींद्र कोळी यांनी जिवंत काडतुसे लपवले होते. तर पवन नवल माळी याने कपडे जाळून पुरावे नष्ट केले. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी तब्बल २१ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी आर के गढरी, मनोज पाटील, हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज, आरोपी यांचे आपसातील वकीलाशी संवाद याबाबतचे सिडीआर रिपोर्ट, बलेक्टड अधिकारी, डी एन ए रिपोर्ट ग्राह्य धरत न्या पी आर चौधरी यांनी आरोपी तुषार आनंदा कोळी (वय २३), भरत संजय रायसिंग (वय २२), बंटी उर्फ शांताराम अभिमन कोळी (वय १९), आंनदा आत्माराम कोळी (वय ५६),रवींद्र आंनदा कोळी (वय २०) यांना खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. तसेच शस्र कायदा ३ ,७ व २५ प्रमाणे पाच वर्षे शिक्षा आणि १ हजार रुपये दंड , दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. तर ऍड नितीन मंगल पाटील (वय ४३), पवन नवल माळी (वय २२) यांना संगनमत करणे,पुरावा नष्ट करणे यानुसार कलम २०१ व ३४ प्रमाणे ५ वर्षे शिक्षा आणि १ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे, हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, विशाल तायडे यांनी काम पाहिले.