
अमळनेर : वृद्ध महिलांना बोलण्यात गुंगवून व बतावणी करून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या चोपडा तालुक्यातील वटार येथील महिलेस अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
३१ जानेवारी रोजी सिंधुबाई संतोष चव्हाण वय ७६ रा अजंदे ता शिंदखेडा ही महिला जळगाव जाण्यासाठी अमळनेरला दुपारी १२ वाजता पोहचली तिच्याजवळ एक अनोळखी महिला येऊन तिला जबरदस्ती फुटाणे खायला देत होती. ती जबरदस्तीने १०० रुपये मागत होती. तिच्या मागे मागे फिरून सिंधुबाईला बसस्थानक बाहेर रस्ता ओलांडून मेडिकल वर घेऊन गेली. तेथे गेल्यावर तिच्या पाठीवर हात ठेवून तुझी माळ छान आहे ती मला फोटो काढायला दे म्हणून मागितली आणि सिंधुबाईने माळ काढून दिली. फोटो काढण्यासाठी ती माळ घेऊन गेली तर परत आलीच नाही. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी शोध पथकाला आरोपी शोधण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून , सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेतला असता ती वटार ता चोपडा येथील रहिवासी आशाबाई बाळू तायडे वय ६३ ही असल्याचे समजले. पोलिसांनी तिला १३ रोजी अटक केली आहे.




