
संचालक मंडळाची निवड बेकायदेशीर असल्याचा धर्मदाय उपआयुक्तांचा निर्वाळा…
अमळनेर:- खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळाची निवड २०१८ पासूनच बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत धर्मदाय उपआयुक्त एम डी गाडे यांनी तीन महिन्यांच्या आत निरीक्षकांनी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे सुमोटो आदेश ४ एप्रिल रोजी दिले आहेत. नवीन संचालक मंडळ निवडून येईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ काळजीवाहू म्हणून काम पाहिलं असेही आदेशात म्हटले आहे.
२०२२ ते २५ या कार्यकाळासाठी नवीन संचालक मंडळ निवडून आले होते. या नवीन कार्यकारिणीने चेंज रिपोर्ट सादर केला होता. १६ डिसेम्बर २०१८ ला सर्वसाधारण सभेने निवडणुकीबाबत काही नियम बनवले होते. आणि सर्वसाधारण सभेला संस्थेचे सर्वोच्च अधिकार आहेत. नियमांच्या बदलाबाबत अपील प्रलंबित असल्यामुळे २०१८ ते २०२१ कालावधीसाठी झालेली निवडणूक देखील नियमाप्रमाणे झालेली नाही म्हणून ते संचालक मंडळ देखील बेकायदेशीर आहे. आणि २०१८ पासूनचे संचालक मंडळच कायदेशीर नसल्याने निवडणूक कोणी घ्यावी असा प्रश्न निर्माण होतो म्हणून धर्मदाय उपआयुक्त एम डी गाडे यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकांनी तीन महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यमान संचालक मंडळ काळजीवाहू म्हणून काम पाहताना आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेताना पूर्वपरवानगी शिवाय काहीच करणार नाही असेही आदेशात म्हटले आहे.




