
अक्षय्य तृतीयेला ध्वजारोहण आणि स्तंभारोपण, तर १९ रोजी रथोत्सव मिरवणूक…
अमळनेर:- विठ्ठल रुख्मिणी संस्थान अमळनेर व पंढरपूरच्या विद्यमाने संत सद्गुरू सखाराम महाराज यात्रोत्सवाला १० मे अक्षय्य तृतीयेपासून ध्वजारोहण आणि स्तंभरोपणाने सुरुवात होणार आहे.
१० ते १७ दररोज सकाळी तुकाराम महाराज गाथा भजन, १७ रोजी सायंकाळी चवथे गादी पुरुष हभप प्रल्हाद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप जयदेव बाबा गुरव यांचे कीर्तन, १८ रोजी सकाळी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे आगमन होईल व सायंकाळी कीर्तन होईल. १९ रोजी सायंकाळी साडे सात वाजता मोहिनी एकादशीला रथोत्सव मिरवणूक, २२ रोजी संत सदगुरु सखाराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाडी चौकात सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २३ रोजी सकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक होईल. २४ रोजी सकाळी हभप मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्सवाची सांगता होईल.
त्या दरम्यान हभप शारंगधर बुवा, अनिता पद्माकर जोशी (छत्रपती संभाजी नगर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम, हभप लोटांगणे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम, भुसावळ येथील सांस्कृतिक कला निकेतनचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम, गुरुदत्त भजनी मंडळ संत सखाराम महाराज संस्थान यांच्या भजनाचा कार्यक्रम, रमाकांत भालेराव भुसावळ यांच्या कथ्थक नृत्याचा कार्यक्रम , हभप हर्षद किसन गोळेसर, सिन्नर यांच्या अभंगाचा कार्यक्रम, गंधाली मनोज देशपांडे हिचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम , हभप श्रीनिवास महाराज उत्राणकार यांच्या परंपरेच्या भजनाचा कार्यक्रम होईल.
सुमारे महिनाभर बोरी नदीच्या वाळवंटात यात्रा सुरू असते. यात्रेत विविध प्रकारचे पाळणे, झुले, जायन्ट व्हील, खेळण्याची दुकाने, खाद्य पदार्थ, घरगुती भांडी,शोभेच्या वस्तू, कपडे, महिलांचे दागिने, अलंकार आदी प्रकारची दुकाने थाटलेली असतात. महाराष्ट्रातून लाखो भाविक यात्रेला येत असतात.




