
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी नेरकर यांचे आवाहन…
अमळनेर:- तापी नदीतील पाणी आटल्याने लांबलेला पाणीपुरवठा विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने आणखी लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे.
तापी नदीवरील जळोद डोह आटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने कलाली डोहातून ६५ अश्वशक्ती चे तीन पंप सुरू करण्यात आले आहेत. तसेच गंगापुरी डोहातून चारी खोदून पाणी जळोद डोहात आणले जात आहे. मात्र गंगापुरी डोहातील पाण्याची पातळी देखील खोल जात असल्याने नगरपालिकेतर्फे आणखी खोल चारी करून उर्वरित पाणी साठा जळोद डोहाकडे वळवला जात आहे.
टंचाईची परिस्थिती पाहून आहे तेव्हढ्या पाण्यात काटकसर करत एक दोन दिवस उशिराने पाणी पुरवठा लांबवला गेला. मात्र महिन्याभरापासून तांत्रिक अडचणी उदभवल्याने शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा दहा ते तेरा दिवसांनी होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. कलाली येथून पर्यायी पाणीपुरवठा केला जात असला तरी एकदा गार्डिंग चिकटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. तोच जंपर तुटला. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा वीज खंडित करून काम करण्यात आले. आणखी एक दिवस वीज पुरवठा खंडीत झाला म्हणून टाक्या वेळेवर भरल्या गेल्या नाहीत विलंब झाला आणि नागरिकांना पाणी मिळण्यास आणखी उशीर झाला.
रमजान, गुढी पाडवा, मुलांना सुटी यामुळे प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची वर्दळ आहे. जास्त पाण्याची गरज असताना आठ दहा दिवस पाणी मिळत नाही. अधिकारी ,कर्मचारी व्हॉल्वमन यांच्यात ताळमेळ नसल्याने कधी कमी दाबाने, कधी रात्री, कधी सकाळी पाणीपुरवठा करतात. विचारल्यावर उर्मट उत्तरे देतात त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्च्यांचा इशारा मुख्याधिकारी तुषार नेरकर, पाणीपूरवठा अभियंता प्रवीण बैसाणे नागरिकांनी दिला आहे.
प्रतिक्रिया…
आवर्तन घेतल्यास ते एक ते सव्वा महिनाच टिकते. आणि जुलै पर्यंत टंचाईवर उपाययोजना करायची असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे. तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने टाक्या भरण्यास अडचण आली. याबाबत महावितरणशी पत्रव्यवहार केला आहे.
तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद




