
जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाविद्यालयाचा उपक्रम…
अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित स्व.पी.सी.भांडारकर कॉलेज ऑफ डी फार्मसी व प्रो. आर.के. केले.कॉलेज ऑफ बी.फार्मसीच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त शहरातील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये फार्मासिस्ट म्हणून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात असलेल्या बाह्यरुग्ण विभाग, सर्जिकल विभाग, आंतररुग्ण विभाग, नर्सिंग विभाग,पॅरामेडिकल विभाग,आहार विभाग, फार्मसी विभाग, ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, रेडिओलॉजी विभाग, आयुष विभाग, क्षयरोग तपासणी विभाग, मधुमेह व हृदयरोग विभाग, प्रयोगशाळा, समुपदेशन कक्ष, शवविच्छेदन गृह यांचा अभ्यास करता यावा यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एड्स आजाराची खबरदारी व नियंत्रण याबाबत तसेच एआरटी विभाग व इतर उपयुक्त माहिती रुग्णालयातील उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रा.स्वप्नाली महाजन व प्रा.सुनीता चोपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे चेअरमन योगेश मुंदडा,प्राचार्य डॉ.रवींद्र सोनवणे,प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.




