अमळनेर:- तालुक्यातील करणखेडे येथील आग लागून नुकसान झालेल्या दोघा कुटुंबांना अमळनेर तालुका काँग्रेस व मोर्य संघटनेकडून मदत करण्यात आली.
बापू राजधर मनोरे व आसाराम राजधर मनोरे या दोघांच्या घराला आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या. मात्र सुदैवाने यात कोणाचीही जीवित हानी झाली नाही. मौर्य क्रांती संघटनेच्या माध्यमातून धनगर समाज बांधव व अमळनेर तालुका काँग्रेस कार्यकर्ते यांनी मिळून भरीव मदत जमा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मदत त्यांच्या हाती सोपवली. करणखेडा येथे समक्ष जाऊन तेथे दोघेही कुटुंबीयांची विचारपूस केली , त्यांना धीर देताना संदीप घोरपडे यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की, दिनांक 17 रोजी ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने गावातील तरुण कार्यकर्त्यांनी समजूतदार ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन मदत फेरी काढावी. व या कुटुंबीयांचे उध्वस्त झालेले जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार मदत करावी. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील, गोकुळ बोरसे, बन्सीलाल भागवत, प्रताप नागराज पाटील, रोहिदास तुका पाटील, रामकृष्ण पाटील, तेले सर, सरपंच गुलाब धनगर, सुधाकर बाबा, कवी शरद धनगर , प्रशांत निकम व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे आदी उपस्थित होते.