
चांदणी कुऱ्हे जवळ असलेला अंडरपास बोगदा पावसामुळे भरला, प्रवाश्यांचे हाल…
अमळनेर:- सातत्याने येणाऱ्या रेल्वे गाड्यांचा अडथळा वाहतुकीला येऊ नये म्हणून चांदणी कुऱ्हे जवळ असलेला अंडर पास बोगदा पावसामुळे भरल्याने दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे विभागाचे नियोजन नसल्याने प्रवाश्यांचे हाल होत आहेत.

दोन दिवसांपूर्वी अमळनेर तालुक्यात वादळ आणि अवकाळी पाऊस पडल्याने नुकताच सुरू झालेल्या अंडरपास बोगद्यात पाच ते सहा फुटाचे पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली. प्रवाश्यांना पर्यायी चिखली नदीच्या पुलाखालून असलेला मार्ग अवलंबावा लागला. त्यामुळे जादाचे इंधन खर्च आणि विलंब होत आहे. प्रशासनाने दोन दिवस नव्या अंडर पास बोगद्याखालील वाहतूक बंद केली आहे. तात्पुरती उपाययोजना करून पाणी काढणे सुरू केले आहे. मात्र हे पाणी पर्यायी रस्त्यावरच टाकले जात असल्याने तेथेही चिखल झाल्याने वाहनांना काढणे अवघड जात आहे. मोटरसायकली घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. कुऱ्हे गावाकडे पर्यायी रस्त्यावर खड्डे पडले आणि पावसाने चिखल झाल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.




