
पंचायत समितीत जिल्हा शिक्षणाधिकारींसमोर घडली घटना…
अमळनेर:- केंद्रप्रमुख व खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत विनापरवानगी प्रवेश करून तालुक्यातील जवखेडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालकाने गटशिक्षणाधिकारींना मारहाण करून त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याची घटना १६ रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात घडली.

प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात केंद्रप्रमुख आणि खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांची आधार कार्ड संदर्भात बैठक सुरू होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास जवखेडा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थाचालक भटू मुरलीधर पाटील याना बोलावले नसताना त्यांनी विनापरवानगीने बैठकीत प्रवेश करून शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना आपण बाहेर चहा प्यायला जाऊ असे सांगितले. त्यावेळी विकास पाटील यांनी तुमच्या शाळेतून विद्यार्थ्यांनी सानेगुरुजी शाळेत प्रवेश घेतला आहे आणि त्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन विनंती पाठवून देखील त्यांचे दाखले तुम्ही दिले नाहीत असे सांगितले असता भटू पाटील म्हणाले की, ही गटशिक्षणाधिकारींची चूक आहे. तेव्हा विकास पाटील यांनी ही गटशिक्षणाधिकारींची चूक नाही असे सांगितले. तेव्हा गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील म्हणाले की, भटू पाटील यांच्याविरोधात तक्रारी आल्या आहेत. त्याचा राग येऊन भटू पाटील याने रावसाहेब पाटील यांच्या डोळ्यावर बुक्का मारला आणि अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली. माझा भाऊ वकील आहे माझे कोणीच वाकडे करू शकत नाही म्हणत दमदाटी करून निघून गेला. रावसाहेब पाटील यांच्या उजव्या डोळ्याला जखम झाली असून त्यांच्यावर नेत्ररोगतज्ञ डॉ. राहुल मुठे यांनी तातडीने उपचार केले. त्यांनतर अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भटू पाटील विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच अश्लील शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ हितेश चिंचोरे करीत आहेत.




