
दोन महिलांसह पाच जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- प्रवाशी आणि एस टी चालक वाहकांचे भांडण सोडवायला गेलेल्या चालकांच्या तोंडावर लोखंडी वस्तू मारून जखमी केल्याची घटना १४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. दोन महिलांसह पाच जणांवर दंगल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक समाधान भगवान लांडगे हे नाशिक येथून बस घेऊन परत आल्यानंतर त्यांना बसस्थानकात तीन पुरुष आणि दोन महिला, काही वाहक आणि चालकांशी भांडण करताना दिसले म्हणून ते भांडण आवरायला गेले असता आनंदा नाना पाटील (रा. अंतुर्ली), मोहित किसन वाघ व सारिका मोहित वाघ (दोन्ही रा सीताराम नगर , उल्हासनगर) अनिल देवराम सोनवणे, मनीषा अनिल सोनवणे (रा. अवधान ता. धुळे) या पाचही जणांपैकी एकाने हातातील लोखंडी वस्तूने समाधानच्या नाकावर मारून रक्तबंबाळ केले. इतरांनी खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका महिलेने मी महिला आहे. तुझ्यावर खोटा आळ घेऊन खोट्या केसेस करेल अशी धमकी दिली. त्याचवेळी इतर वाहक व चालकांनी भांडण आवरले त्यात दर्शन सोमवंशी याच्या खिशातील तिकिटाचे ११ हजार २३० रुपये पडून नुकसान झाले. आगार व्यवस्थापकाला घटना सांगितल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला दोन महिला व तीन पुरुषांसह दंगल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ. चंद्रकांत पाटील करीत आहेत.




